पंजाब किंग्जचा तडाखेबंद फलंदाज आशुतोष शर्माने पुन्हा एकदा तुफानी खेळी करत चाहत्यांची मने जिंकली. आशुतोषने कठीण परिस्थितीत पंजाबसाठी केवळ २३ चेंडूत स्फोटक अर्धशतक झळकावले. या सामन्यात सर्वांच लक्ष वेधून घेणारा क्षण म्हणजे आशुतोष शर्माने बुमराहच्या चेंडूवर लगावलेला षटकार. आशुतोषने बुमराहच्या चेंडूवर लॅप शॉट खेळून सर्वांना आश्चर्यचकित केले. मात्र, आशुतोष शर्मा पंजाबला विजयापर्यंत नेऊ शकला नाही.

१३व्या षटकात जसप्रीत बुमराह त्याचे तिसरे षटक टाकत होता. या षटकात त्याने आशुतोष शर्माला एक चेंडू नो-बॉल टाकला. याचा फायदा घेत आशुतोषने स्वीप शॉट मोठ्या सहजतेने मारत अप्रतिम षटकार लगावला. आशुतोषचा हा षटकार पाहून डगआऊटमध्ये बसलेला सूर्यकुमारही थक्क झाला. जगातील नंबर वन गोलंदाजासमोर न डगमगता आशुतोषने थेट षटकार लगावल्याने सगळेच चकित झाले. तर बुमराहसारख्या गोलंदाजाला लगावलेला षटकार पाहून आशुतोषचाही आनंद गगनात मावेनासा झाला.

आशुतोषने सामन्यानंतर बुमराहला लगावलेल्या षटकारावर आपली प्रतिक्रिया देताना म्हणाला, “जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर स्वीप शॉट मारणे हे माझे स्वप्न होते. मी अशा स्वीप शॉट्सचा खूप सराव केला आहे. संघाला विजय मिळवून देऊ शकेन असा विश्वास होता.”

याशिवाय पंजाब किंग्जचा फलंदाज आशुतोषने आकाश मढवालविरुद्ध शानदार शॉट खेळला ज्यामुळे स्टेडियममध्ये उपस्थित सर्वजण थक्क झाले. आशुतोषच्या दोन्ही षटकारांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दुसऱ्यांदा, १६व्या षटकात आकाश मढवाल गोलंदाजीसाठी आला तेव्हा चौथा चेंडू नो बॉल होता, ज्यावर आशुतोषने षटकार खेचून झंझावाती अर्धशतक पूर्ण केले. पुढच्याच चेंडूवर आशुतोषने रिव्हर्स स्वीप करत शानदार षटकार ठोकला. मढवालच्या चेंडूवर आशुतोषने शानदार शैलीत बॅट फिरवली आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला.