आयपीएल २०२२ हंगामाच्या १४ व्या सामन्यात पाचवेळा आयपीएल चषक आपल्या नावावर केलेल्या मुंबई इंडियन्सला कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभवाला सामोरं जावं लागलं. अगदी हातात असलेला हा सामना कोलकात्याच्या पॅट कमिन्सने अगदी शेवटी हिसकावून नेला. यामुळे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा चांगलाच निराश झाला. त्याची ही निराशा सामन्यानंतर समालोचकांच्या प्रश्नांना उत्तरं देताना दिसली. या पराभवानंतर समालोचकांनी विचारलेल्या प्रश्नोत्तरांच्या सत्रात रोहितने वैतागून “आवाज बढाओ यार…” म्हटलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.

नेमकं काय झालं?

कोलकाता आणि मुंबईमधील सामना संपल्यानंतर रोहितला पराभूत संघाचा कर्णधार म्हणून समालोचकांनी काही प्रश्न विचारले. यात समालोचक डॅनी मॉरिसनने रोहितला प्रश्न विचारला, मात्र रोहितला कमी आवाज येत असल्याने हा प्रश्न ऐकूच आला नाही. त्यामुळे वैतागून रोहितने साऊंड सिस्टमचं काम पाहणाऱ्याला वैतागून “आवाज बढाओ यार…” म्हटलं. असं असलं तरी रोहितने नंतरच्या प्रश्नोत्तरांना खिलाडूवृत्तीने उत्तरं देत मुंबईच्या पराभवाचं विश्लेषण केलं.

रोहित शर्माने यावेळी पॅट कमिन्सच्या फलंदाजीचं चांगलंच कौतुक केलं. तसेच कमिन्स अशा पद्धतीने खेळेल असं वाटलं नसल्याची कबुलीही दिली. यावेळी रोहितने मुंबईच्या पराभवावर बोलताना गोलंदाजांनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नसल्याचंही नमूद केलं.

हेही वाचा : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्सचा फलंदाज मनिष पांडेला ड्रॉप करण्याबाबत मोठी प्रतिक्रिया

रोहित शर्मा म्हणाला, “पॅट कमिन्स मैदानावर येईल आणि असं खेळेल याची कल्पना नव्हती. सामना जसा जसा पुढे गेला तसतसं मैदान फलंदाजांसाठी चांगलं झालं. फलंदाजीत आम्ही सुरुवातीला चांगली कामगिरी करू शकलो नाही. शेवटच्या ४-५ सामन्यात खेळाडूंनी चांगली मेहनत घेतली. याशिवाय ठरल्याप्रमाणे गोलंदाजी देखील झाली नाही. १५ व्या षटकापर्यंत सामना आमच्या हातात होता. मात्र, त्यानंतर कमिन्सने चांगली फलंदाजी केली.”