scorecardresearch

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : मुंबई इंडियन्स लवकरच सावरेल!

पाच वेळा ‘आयपीएल’ विजेता मुंबईचा संघ सलग पाच पराभवांची मालिका लवकरच खंडित करेल, असा विश्वास सूर्यकुमारने व्यक्त केला.

अनुभवी फलंदाज सूर्यकुमारला खात्री

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या नव्या हंगामाच्या सुरुवातीलाच पाच पैकी पाच सामने गमावले असले तरी मुंबई इंडियन्सचा संघ यातून सावरेल, अशी खात्री अनुभवी फलंदाज सूर्यकुमार यादवने व्यक्त केली आहे. 

‘‘यंदा नव्याने खेळाडू लिलाव प्रक्रिया झाल्याने संघात बरेच बदल घडले. आमचा संघ सध्या संक्रमणाच्या काळातून जात आहे. आम्ही केवळ यंदाच्या नाही, तर पुढील तीन-चार हंगामांच्या दृष्टीने विचार करत आहोत. आमच्या संघातून बरेच नवखे, युवा खेळाडू नावारूपाला येतील. डेवॉल्ड ब्रेव्हिस आणि तिलक वर्मासारख्या युवा खेळाडूंनी यंदा दमदार कामगिरी करत सर्वानाच प्रभावित केले आहे,’’ असे सूर्यकुमार म्हणाला.    

पाच वेळा ‘आयपीएल’ विजेता मुंबईचा संघ सलग पाच पराभवांची मालिका लवकरच खंडित करेल, असा विश्वास सूर्यकुमारने व्यक्त केला. ‘‘निकाल आमच्या बाजूने लागत नसले, तरी आम्ही एकंदरीत चांगली कामगिरी करत आहोत. मुंबईसारखा संघ विजय मिळवण्याचे दडपण बाळगत नाही. गेल्या काही वर्षांपासून आमची प्रक्रिया ठरलेली आहे आणि त्यानुसारच आम्ही खेळतो. आम्हाला हंगामातील पहिला विजय मिळवण्यासाठी फार काळ वाट पाहावी लागणार नाही. आम्ही केवळ सांघिक कामगिरी करून ध्येयप्राप्तीच्या दृष्टीने प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे. आम्ही सरावादरम्यान खूप मेहनत घेत आहोत. या मेहनतीचे फळ आम्हाला मिळेल आणि आमचा संघ लवकरच सावरेल, याची मला खात्री आहे,’’ असेही सूर्यकुमारने नमूद केले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Batsman suryakumar yadav statement on mumbai indians defeat zws

ताज्या बातम्या