scorecardresearch

गतविजेत्या चेन्नईची कोलकाताशी सलामी ; इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर

यंदा मुंबई आणि पुणे येथे २६ मार्चपासून ‘आयपीएल’चे ७० साखळी सामने खेळवण्यात येणार आहेत

गतविजेत्या चेन्नईची कोलकाताशी सलामी ; इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर

मुंबई : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि युवा श्रेयस अय्यरचा कोलकाता नाइट रायडर्स या संघांत इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १५व्या हंगामातील सलामीचा सामना रंगणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रविवारी ‘आयपीएल’चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले.

यंदा मुंबई आणि पुणे येथे २६ मार्चपासून ‘आयपीएल’चे ७० साखळी सामने खेळवण्यात येणार आहेत. मुंबईतील वानखेडे आणि ब्रेबॉर्न स्टेडियम, नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियम आणि पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे स्टेडियम या चार ठिकाणांवर ‘आयपीएल’चा थरार रंगणार असून स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यासाठी स्टेडियमच्या एकूण प्रेक्षकक्षमतेपैकी २५ टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्यात येणार आहे.

तब्बल ६५ दिवस रंगणाऱ्या या स्पर्धेतील एकूण १२ वेळा एकाच दिवशी दोन सामने होणार असून दुपारच्या लढतींना ३.३०, तर सांयकाळच्या लढतींना ७.३० वाजल्यापासून प्रारंभ होईल. बाद फेरीच्या लढती कोणत्या स्टेडियमवर खेळवण्यात येणार, हे पुढील काही आठवडय़ांत स्पष्ट होईल. २९ मे रोजी ‘आयपीएल’च्या १५व्या हंगामाचा विजेता ठरेल.

यंदा ‘आयपीएल’मध्ये गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स या दोन नव्या संघांची भर पडली आहे. त्यामुळे १० संघांची प्रत्येकी दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या गटात मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनऊ, कोलकाता आणि राजस्थान रॉयल्स या संघांचा समावेश असून दुसऱ्या गटात चेन्नई, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु, सनरायजर्स हैदराबाद, गुजरात आणि पंजाब किंग्ज हे संघ आहेत. प्रत्येक संघ १४ सामने खेळणार आहे.

सर्व संघांचे सलामीचे सामने

* २६ मार्च : चेन्नई सुपर किंग्ज वि. कोलकाता नाइट रायडर्स

* २७ मार्च : मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स

 : पंजाब किंग्ज वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु

* २८ मार्च : लखनऊ सुपरजायंट्स वि. गुजरात टायटन्स * २९ मार्च : सनरायजर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या