भारताचा अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहाला मुलाखतीसाठी वारंवार धमकावल्याप्रकरणी क्रीडा पत्रकार, लेखक, संवादक बोरिया मजुमदार यांच्यावर बीसीसीआयने दोन वर्षांची बंदी घातली आहे. याआधी बीसीसीआयने बोरिया मजुमदार यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमली होती.

हेही वाचा >>> अरे बापरे! मोहम्मद शमीच्या चेंडूवर लगावला ११७ मीटर लांबीचा षटकार, लियामची फलंदाजी पाहून सगळेच अवाक

नेमकं प्रकरण काय?

पश्चिम बंगालमधील ३७ वर्षीय यष्टीरक्षक वृद्धिमान साहाने १९ फेब्रुवारीला एक ट्वीट केलं होतं. यात त्याने पत्रकार मुजुमदार यांनी केलेल्या मेसेजचा स्क्रिनशॉट पोस्ट केला होते. तसेच “भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानानंतर एका कथित आदरणीय पत्रकाराकडून मला हे सहन करावं लागत आहे. या पातळीवर पत्रकारिता पोहचली आहे.” असंदेखील वृद्धीमान साहा या ट्विटमध्ये म्हणाला होता. साहाच्या या ट्विटनंतर सगळीकडे खळबळ उडाली होती. त्यानंतर बीसीसीआयने या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

हेही वाचा >>> राहुल तेवतियाला राग अनावर, भर मैदानात साई सुदर्शनवर भडकला, पाहा व्हिडीओ

सखोल चौकशीअंती बोरिया मजुमदार दोषी आढळले आहेत. त्यानंतर आता बीसीसीआयने त्यांच्यावर दोन वर्षांची बंदी घातली आहे. या बंदीनुसार सर्व राज्य क्रिकेट मंडळांना मजुमदार यांना स्टेडियममध्ये प्रवेश करण्यास बंदी घालावी असे सांगण्यात येणार आहे. तसेच देशातील सामन्यांमध्ये मजुमदार यांना माध्यम प्रतिनिधी म्हणून मान्यता दिली जाणार नाही. तसेच मजुमदार यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे यासाठी बीसीसीआयकडून आयसीसीला एक पत्रही पाठवले जाणार आहे, अशी माहिती बसीसीआयच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.