scorecardresearch

बीसीसीआयच्या अध्यक्षांकडून उमरान मलिकचे कौतुक; म्हणाले, “आतापर्यंतच्या आयपीएल सामन्यांचा…”

जम्मू शहरातील हा २२ वर्षीय खेळाडू सध्या चर्चेचा विषय आहे, ज्याची आता बीसीसीआयमध्येही चर्चा होत आहे.

BCCI President Sourav Ganguly told Umran Malik the face of IPL 2022
(फोटो – इंडियन एक्सप्रेस)

आतापर्यंत अनेक भारतीय आणि परदेशी खेळाडूंनी आयपीएल २०२२ च्या हंगामातील कामगिरीने क्रिकेटप्रेमींना प्रभावित केले आहे. त्यात इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलर, गोलंदाज युझवेंद्र चहल, आरसीबीचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक आणि सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक यांचा समावेश आहे. दुसरीकडे, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर उमरान मलिकने प्रभाव टाकला आहे.

आयपीएलच्या १५ व्या हंगामात गोलंदाजांनीही आपला दर्जा उंचावला आहे. त्यात उमेश यादव, टी नटराजन आणि कुलदीप यादव या खेळाडूंचा समावेश आहे, ज्यांनी मागील हंगामात चांगली कामगिरी केली नव्हती. मात्र, या सर्वांशिवाय सर्वांचे लक्ष वेधून घेणारा खेळाडू म्हणजे सनरायझर्स हैदराबादचा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक. जम्मू शहरातील हा २२ वर्षीय खेळाडू सध्या चर्चेचा विषय आहे, ज्याची आता बीसीसीआयमध्येही चर्चा होत आहे.

अनेकदा १५० किमी प्रतितासचा टप्पा ओलांडणाऱ्या उमरान मलिकने सौरव गांगुलीइतकेच क्रिकेटप्रेमींना प्रभावित केले आहे. आयपीएल लिलावापूर्वी सनरायझर्स हैदराबादने उमरानला कायम ठेवले होते. तो आता पर्पल कॅपच्या शर्यतीत आहेत. अगदी सौरव गांगुलीनेही त्याचे वर्णन या हंगामातील आयपीएलच्या स्पर्धेचा चेहरा म्हणून केले आहे.

“मी खूप मनोरंजक आयपीएल पहात आहे. कोणताही संघ जिंकू शकतो आणि प्रत्येकजण चांगला खेळत आहे. दोन नवीन संघ गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स चांगली कामगिरी करत आहेत. उमरान मलिकची गोलंदाजी प्रभावी आहे. उमेश यादवने चांगली गोलंदाजी केली आहे आणि खलील अहमदनेही. मी म्हणेन की उमरान मलिक आतापर्यंतच्या लीगचा चेहरा आहे,” असे कोलकाता नाईट रायडर्सचा माझी कर्णधार असलेल्या गांगुलीने म्हटले आहे.

उमरानने या मोसमात आतापर्यंत १५ विकेट घेतल्या आहेत. गुजरात टायटन्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याने मोसमातील सर्वोत्तम कामगिरी केली. चार षटकांत उमरानने २५ धावांत पाच गडी बाद केले. हैदराबादचा पराभव होऊनही त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उमरान मलिक म्हणाला की, “वेग ही माझी नैसर्गिक ताकद आहे. या वर्षी मी अधिक चांगली लाईन आणि लेंथ ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. मी नेहमी वेगवान गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. मला जम्मू-काश्मीर आणि माझ्या देशाला अभिमान वाटावा अशी इच्छा आहे. मी माझ्या खेळात सुधारणा करण्यावर भर देत आहे.”

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bcci president sourav ganguly told umran malik the face of ipl 2022 abn

ताज्या बातम्या