इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आतापर्यंतच्या सर्व हंगामांतील सातत्यपूर्ण कामगिरी करणारा संघ ही चेन्नई सुपर किंग्जची ओळख. परंतु मागील दोन हंगामांमध्ये मैदानाबाहेरील घडामोडींमुळेही चेन्नई सुपर किंग्ज संघ चर्चेत राहिला. आयपीएलच्या आठव्या पर्वात विजयी सलामी नोंदवण्याची चेन्नईला चांगली संधी असेल, कारण त्यांचा गुरुवारी सामना आहे तो मागील हंगामात तळाच्या स्थानावरील दिल्ली डेअरडेव्हिल्सशी.
स्पॉट-फिक्सिंग आणि सर्वोच्च न्यायालयातील खटला यातून चेन्नई सुपर किंग्जचा संघ सावरण्याचा प्रयत्न करीत आहे. आतापर्यंतच्या सात आयपीएलमध्ये प्रत्येकदा अंतिम चार संघांपर्यंत या संघाने मुसंडी मारली होती. यापैकी चार वेळा सलग अंतिम फेरी गाठताना दोनदा विजेतेपद या संघाच्या खात्यावर जमा आहेत. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली आणि स्टीफन फ्लेमिंगच्या मार्गदर्शनाखाली चेन्नईचा संघ गेल्या तीन वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी उत्सुक आहे.
इरफान पठाण, मायकेल हसी, कायले अॅबॉट आणि राहुल शर्मा हे खेळाडू चेन्नईच्या दिमतीला आहेत. नुकत्याच झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत बेफाम फटकेबाजी करणारा न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅक्क्युलम आणि ड्वेन स्मिथ त्याच्या आघाडीची धुरा सांभाळतील. सुरेश रैना, हसी, धोनी, ड्वेन ब्राव्हो मधल्या फळीत असतील. दिग्गज खेळाडू अपयशी ठरल्यास रवींद्र  जडेजा आणि रवीचंद्रन अश्विन हेसुद्धा जबाबदारीने फलंदाजी करू शकतात.
गोलंदाजीत अश्विन आणि जडेजा हीच मंडळी फिरकी मारा करतील. अॅबॉट, मॅट हेन्री आणि मोहित शर्मा वेगवान मारा करतील. ब्राव्होच्या माऱ्यामध्ये वैविध्य आहे.
दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाची मदार असेल ती ३३ वर्षीय युवराज सिंगवर. लिलावामध्ये दिल्ली संघाने विक्रमी १६ कोटी रुपयांना युवीला खरेदी केले होते. याशिवाय ३६ वर्षीय झहीर खानसुद्धा आपल्या कामगिरीद्वारे भारतीय संघात परतण्यासाठी इच्छुक आहे. जीन-पॉल डय़ुमिनीच्या नेतृत्वाखाली हा संघ आपले नशीब पालटण्यासाठी उत्सुक आहे.
दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉक आणि मयांक अगरवाल हे सलामीसाठी चांगले पर्याय असतील. त्यानंतर डय़ुमिनी, युवराज, केदार जाधव, अॅल्बी मॉर्केल मधल्या फळीत खेळतील. याशिवाय लेग-स्पिनर इम्रान ताहीर, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हेसुद्धा दिल्ली संघाकडे ओहत.
संघ
चेन्नई सुपर किंग्स : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), माइक हसी, ड्वेन स्मिथ, ड्वेन ब्राव्हो, ब्रेंडन मॅक्क्युलम, एकलव्य त्रिवेदी, कायले अॅबॉट, बाबा अपराजित, आर. अश्विन, सॅम्युअल बद्री, अंकुश बेन्स, फॅफ डू प्लेसिस, मॅट हेन्री, रवींद्र जडेजा, मिथुन मन्हास, रोनित मोरे, पवन नेगी, आशीष नेहरा, ईश्वर पांडे, इरफान पठाण, प्रत्युश सिंग, सुरेश रैना, मोहित शर्मा, राहुल शर्मा, अॅण्ड्रय़ू टाय.
दिल्ली डेअरडेव्हिल्स : जे पी डय़ुमिनी (कर्णधार), युवराज सिंग, क्विंटन डी कॉक, मयांक अगरवाल, श्रीकर भरत, नॅथन कल्टर-नील, डॉमिनिक जोसेफ, चिदम्बरम गौतम, ट्रॅव्हिस हेड, इम्रान ताहीर, श्रेयस अय्यर, केदार जाधव, केके जियास, झहीर खान, अँजेलो मॅथ्यूज, अमित मिश्रा, मोहम्मद शमी, अॅल्बी मॉर्केल, शाहबाद नदीम, गुरिंदर संधू, मार्कस स्टोनिअस, मनोज तिवारी, सौरभ तिवारी, जयदेव उनाडकत, जयंत यादव.