टीम इंडियाचा माजी सलामीवीर आणि धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागने सध्या सुरू असलेल्या आयपीएल २०२२ च्या पार्श्वभूमीवर सीएसके अर्थातच चेन्नई सुपर किंग्जच्या संदर्भात मोठं विधान केलं आहे.

सेहवागने म्हटलं आहे की, आयपीएल 2022 च्या सुरुवातीला रवींद्र जडेजाला कर्णधार म्हणून नियुक्त करण्याचा चेन्नई सुपर किंग्जचा निर्णय ‘चुकीचा’ होता. आयपीएलचा हा हंगाम सुरू होण्याच्या काही दिवस आधी धोनीने संघाचे कर्णधारपद जडेजाकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. मात्र गतविजेत्या संघाची कामगिरी खराब राहिली. संघाला आठ पैकी फक्त दोन सामनेच जिंकता आले. यानंतर जडेजाने कर्णधारपद परत धोनीकडे देण्याचा निर्णय घेतला.

चेन्नईचा संघ काल (बुधवार) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून (आरसीबी) पराभूत झाला. त्यामुळे त्यांची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे. १० पैकी ७ सामने जिंकून गुणतालिकेत संघ नवव्या क्रमांकावर आहे. आरसीबीविरुद्धच्या सामन्यानंतर सेहवागने क्रिकबझला सांगितले की, “हंगामाच्या सुरुवातीला त्यांनी (चेन्नई) पहिली चूक केली, जेव्हा त्यांनी घोषणा केली की एमएस धोनी कर्णधार होणार नाही आणि रवींद्र जडेजा कर्णधार असेल, तो चुकीचा निर्णय होता.”

सेहवागने या आयपीएल 2022 मधील चेन्नईच्या खराब कामगिरीचे मुख्य कारण म्हणून फलंदाजांचा खराब फॉर्म सांगितले आहे. तो म्हणाला, “ऋुतुराज गायकवाडने सुरुवातीला धावा केल्या नाहीत. संघाची सुरुवात खराब झाली. फलंदाजांनी धावा केल्या नाहीत आणि अशा स्थितीत हंगाम खराब होणे निश्चितच होते. धोनी सुरुवातीपासूनच कर्णधार असता तर बरे झाले असते आणि कदाचित सीएसकेने इतके सामने गमावले नसते.