राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनी संघातील गोलंदाजांच्या कामगिरीवर नाराज झाला आहे. ‘१७७ धावांचा पाठलाग करणे हे आव्हात्मक होते. पण संघातील गोलंदाजांनी अपेक्षित कामगिरी केली नाही. या खेळपट्टीवर गोलंदाजी कशी करायची याच्या सुचना गोलंदाजांना केल्या होत्या. पण गोलंदाजांनी त्या नुसार गोलंदाजी केली नाही’, अशा शब्दात धोनीने नाराजी व्यक्त केली.
जोस बटलरने सलग चौथ्या सामन्यात साकारलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जवर चार गडी राखून विजय मिळवला. शेवटच्या दोन षटकांत राजस्थानला २८ धावांची आवश्यकता होती. पण विलीच्या १८ व्या षटकात राजस्थानच्या फलंदाजांनी १६ धावा चोपल्या आणि यामुळे राजस्थानचा विजय निश्चित झाला.
सामन्यानंतर महेंद्रसिंह धोनीने गोलंदाजांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली. धोनी म्हणाला, या खेळपट्टीवर कशी गोलंदाजी करायची याच्या सुचना आम्ही दिल्या होत्या. बॅक ऑफ लेंथ गोलंदाजी करा, असे गोलंदाजांना सांगितले होते. पण गोलंदाज यात अपयशी ठरले. १७६ ही धावसंख्या पुरेशी होती. पण गोलंदाजांमुळे आम्ही अपयशी ठरलो, असे त्याने सांगितले. आता आमचं लक्ष्य पुढील कामगिरीवर असेल. आम्हाला फक्त बादफेरीसाठी पात्र व्हायचे नाही. आम्हाला आयपीएलमध्ये बाजी मारायची आहे, असे त्याने नमूद केले.
धोनीने गोलंदाजांवर नाराजी व्यक्त करण्यासारखी परिस्थिती असून गेल्या पाच पैकी तीन सामन्यांमध्ये चेन्नईचा पराभव झाला. या तिन्ही पराभवांमध्ये चेन्नईने १६५ पेक्षा जास्त धावा केल्या. पण गोलंदाज निष्प्रभ ठरल्याने चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला.
