IPL 2022: तीन षटकार खेचत गुजरातला फायनल्समध्ये पोहचवणाऱ्या मिलरचं रात्री एक वाजता राजस्थानच्या संघासाठी Tweet; म्हणाला…

आपल्या पहिल्याच पर्वात गुजरातच्या संघाने थेट अंतिम फेरी गाठण्यामध्ये डेव्हिड मिलरचं योगदान महत्वाचं ठरलं

Millar
राजस्थानच्या संघाला पराभूत करण्यामध्ये मिलरचा मोठा वाटा (फोटो आयपीएलकडून साभार)

GT vs RR Qualifier : डेव्हिड मिलर (३८ चेंडूंत नाबाद ६८ धावा) आणि कर्णधार हार्दिक पंडय़ा (२७ चेंडूंत नाबाद ४०) यांच्या दिमाखदार खेळींमुळे गुजरात टायटन्सनी मंगळवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधील ‘क्वॉलिफायर-१’च्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर सात गडी राखून विजय मिळवत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. आपल्या पहिल्याच पर्वात गुजरातच्या संघाने थेट अंतिम फेरी गाठण्यामध्ये डेव्हिड मिलरने मोलाचा वाटा उचलला. मात्र या सामन्यानंतर मिलरने केलेलं ट्विट सध्या चर्चेत आहे.

सामन्यात काय घडलं
नाणेफेक जिंकून हार्दिक पंड्याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना जोस बटलर (५६ चेंडूंत ८९ धावा) आणि कर्णधार संजू सॅमसन (२६ चेंडूंत ४७ धावा) यांच्या आक्रमक खेळींमुळे राजस्थानने २० षटकांत ६ बाद १८८ धावसंख्या उभारली. सलामीवीर यशस्वी जैस्वाल (३) माघारी परतल्यानंतर बटलर आणि सॅमसन यांनी दुसऱ्या गडयासाठी निर्णायक अर्धशतकी भागिदारी रचली.

कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या या लढतीत १८९ धावांच्या आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग करताना गुजरातची अडखळती सुरुवात झाली. सलामीवीर वृद्धिमान साहा खाते न उघडताच माघारी परतला. यानंतर शुभमन गिल (३५ धावा) आणि मॅथ्यू वेड (३५ धावा) यांनी दुसऱ्या गडय़ासाठी ७२ धावांची भागिदारी रचत गुजरातचा डाव सावरला. हे दोघेही माघारी परतल्यानंतर पंडय़ा आणि मिलर यांनी डावाची सूत्रे आपल्या हाती घेत गुजरातला १९.३ षटकांत विजय मिळवून दिला. प्रसिध कृष्णाने टाकलेल्या अखेरच्या षटकात मिलरने सलग तीन षटकार खेचले.

मिलर काय म्हणाला?
या सामन्यामध्ये अगदी सहजपणे एकामागोमाग एक तीन षटकार लगावत शेवटच्या षटकातील १६ धावांचं लक्ष्य तीन चेंडूत पूर्ण करुन तीन चेंडू राखून संघाला अंतिम फेरीत पोहचवणाऱ्या मिलरने राजस्थान रॉयल्स संघाची आणि चाहत्यांची माफी मागितली आहे. मिलरने, ‘सॉरी रॉयल फॅमेली’ असं ट्विट केलंय. त्याचं हे ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. रात्री एक वाजून ९ मिनिटांनी म्हणजेच सामना संपल्यानंतर दीड तासांनी मिलरने हे ट्विट केलंय.

मिलरच्या या ट्विटनंतर अनेकांना राजस्थान रॉयल्सने पाच एप्रिल रोजी केलेलं एक ट्विट आठवलं आहे. यामध्ये युजवेंद्र चहलने बंगळुरुविरोधातील सामन्यात भन्नाट गोलंदाजी केल्यानंतर राजस्थानने जेव्हा तुमचा पूर्वाश्रमीचा प्रियकर किंवा प्रेयसी पिच्छा पुरवते अशा आशयाचा संदेश पोस्ट करण्यात आलेला.

मिलर हा पूर्वी राजस्थानच्या संघाकडून खेळायचा त्यामुळेच अनेकांना राजस्थानच्या संघाने केलेलं हे ट्विट आठवलंय.

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: David miller says sorry to rajasthan royals as he helps gujrat titans to reach ipl 2022 finals scsg

Next Story
इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : गुजरात अंतिम फेरीत; राजस्थानवर सात गडी राखून मात; मिलर, हार्दिक विजयाचे शिल्पकार
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी