आयपीएलच्या पंधराव्या हंगामात आज ५५ व्या लढतीमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांमध्ये सायंकाळी ७.३० वाजता लढत होणार आहे. दोन्ही संघांनी आपली तयारी पूर्ण केली आहे. असे असताना आता दिल्लीच्या ताफ्यामधील एका गोलंदाजाला करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सामन्याला अवघे काही तास शिल्लक असताना एका खेळाडूची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुले दिल्ली संघ अडचणीत सापडला आहे.

हेही वाचा >> कॅप्टन विरुद्ध कॅप्टन! श्रेयस अय्यरच्या डायरेक्ट हीटमुळे लखनऊला मोठा झटका, केएल राहुल शून्यावर बाद

अन्य गोलंदाजांना विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय

चेन्नईसोबतच्या सामन्याला अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना दिल्लीच्या ताफ्यातील नेटमध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या एका गोलंदाजाला करोनाची लागण झाली आहे. त्यानंतर आता दिल्ली फ्रेंचायझीने करोना पॉझिटिव्ह आलेल्या गोलंदाजासोबत ज्यां खेळाडूंनी रुम शेअर केली होती, त्यांना विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय घेतला. आहे. तसेच आयपीएलच्या नियमानुसार आता दिल्लीचे सर्वच खेळाडू तसेच अन्य कर्मचारी यांची करोना चाचणी केली जाणार आहे. तोपर्यंत सर्वच खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा >> ज्या जर्सीवर भारताविरोधात १० विकेट्स घेतल्या तिलाच काढलं विकायला; न्यूझीलंडच्या दिग्गज खेळाडूचा मोठा निर्णय

दिल्ली कॅपिट्लस संघाचा आज सायंकाळी ७.३० वाजता चेन्नईविरोधात नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर सामना होणार आहे. दिल्ली कॅपिटल्स हा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून टॉप चार संघांमध्ये सामील होण्याचा प्रयत्न दिल्लीचा असेल. याआधी दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रशिक्षक रिक पाँटिंग यांच्या परिवारातील सदस्यालाही करोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांनी काही सामन्यांना हजेरी लावली नव्हती.