नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्स संघाने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या नव्या हंगामाची सुरुवात सलग दोन विजयांसह केली असली, तरी आघाडीच्या फळीतील फलंदाजांची कामगिरी त्यांच्यासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

गेल्या हंगामात मधल्या फळीत खेळलेल्या अनुभवी केएल राहुलला यंदा सलामीला पाठवण्याचा निर्णय दिल्लीसाठी अद्याप फारसा फायदेशीर ठरलेला नाही. आता आज, बुधवारी होणार्‍या गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात राहुल आपल्या कामगिरीत सुधारणा करतो का, याकडे चाहत्यांचे लक्ष असेल.

दिल्लीने यंदाच्या हंगामात प्रथम लखनऊ सुपर जायंट्सला, मग घरच्या मैदानावर तुल्यबळ मुंबई इंडियन्सला पराभूत केले. या दोन्ही सामन्यांत दिल्लीच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. तसेच फलंदाजीत २२ वर्षीय समीर रिझवीने चमक दाखवताना सलग दोन अर्धशतके साकारली.

मात्र, सलामीवीर राहुल आणि तिसर्‍या क्रमांकावरील नितीश राणा सपशेल अपयशी ठरले. राहुलला पहिल्या सामन्यात खातेही उघडता आले नाही, तर दुसर्‍या सामन्यात तो केवळ एका धावेवर बाद झाला. दिल्लीला विजयाची मालिका कायम राखायची झाल्यास राहुलला कामगिरीत मोठी सुधारणा करावी लागेल. त्याचा सलामीचा जोडीदार श्रीलंकन पथुम निसांकाने मुंबईिवरुद्ध ३० चेंडूंत ४४ धावांची खेळी करत सूर गवसल्याचे संकेत दिले आहेत.

गोलंदाजीत पुन्हा मुकेश कुमार, लुंगी एन्गिडी, टी. नटराजन, कर्णधार अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच्यावर प्रतिस्पध्र्यांना रोखण्याची जबाबदारी असेल.

दुसरीकडे, माजी विजेत्या गुजरात संघाला विजयाचे खाते अद्याप उघडता आलेले नाही. पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध गुजरात संघ पराभूत झाला. गतवर्षीच्या ‘ऑरेंज कॅप’ विजेत्या साई सुदर्शनने राजस्थानविरुद्ध आक्रमक अर्धशतक साकारले. मात्र, तो बाद झाल्यानंतर गुजरातची मधली फळी ढेपाळली. त्यामुळे शेवटच्या षटकांत रशीद खान आणि कगिसो रबाडा यांनी प्रयत्न करून गुजरातला हार पत्करावी लागली. मधल्या फळीत ग्लेन फिलिप्स, शाहरुख खान, वॉशिंग्टन सुंदर यांना खेळ उंचवावा लागेल. गोलंदाजीत मोहम्मद सिराज आणि रशीद खानकडून गुजरातला सर्वाधिक अपेक्षा असतील.

नवी दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना होणार असून येथील खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल मानली जाते. त्यामुळे मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकेल.

गिल खेळणार

गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलला स्नायूंच्या दुखापतीमुळे राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या गेल्या सामन्याला मुकावे लागले होते. मात्र, तो पुढील सामन्यासाठी उपलब्ध असेल, असे त्या वेळी बदली कर्णधार रशीद खान म्हणाला होता. त्यामुळे गिल या सामन्यात खेळेल अशीच गुजरात संघाला आशा असेल.

फलंदाजीत गिलने साई सुदर्शनसह मिळून गेल्या हंगामात गुजरात संघाला दमदार सलामी दिली होती. गेल्या सामन्यात त्याची उणीव गुजरातला जाणवली. गिल दिल्लीविरुद्ध खेळल्यास युवा कुमार कुशाग्रला पुन्हा संघाबाहेर व्हावे लागू शकेल.

  • वेळ : सायं. ७.३० वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी, जिओहॉटस्टार ॲप.