आयपीएल स्पर्धेदरम्यान क्रिकेट व्यतिरिक्त इतरही बाबी चर्चेत असतात. प्रेक्षक गॅलरीत बसलेले क्रिकेट चाहते लक्ष वेधून घेतात. सामना संपला की संपला त्यांची चर्चा सोशल मीडियावर रंगते. मुंबई इंडियन्स विजयी व्हावी म्हणून प्रार्थना करणारी आजी असो की, आपल्या सौंदर्यांने नेटकऱ्यांना भूरळ घालणारे चेहरे असो, अशा सर्व बाबी कॅमेऱ्यात चित्रित होत असतात. या घडामोडींची मग सोशल मीडियावर चर्चा होते. असाच एक फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. गुजरात टायटन्स आणि सनराईजर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यातील हा फोटो आहे. सनराईजर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्या आयपीएल स्पर्धेतील २१ वा सामना सोमवारी रंगला होता. या सामन्यात हैदराबादने गुजरातला ८ राखून मात दिली. मात्र या सामन्यात प्रेक्षक गॅलरीतून पोस्टर झळकवणारा एक व्यक्ती चर्चेत आहे.

व्हायरल होत असलेल्या फोटोत एका व्यक्तीने सामन्यादरम्यान हातात पोस्टर घेऊन “जर हार्दिकने अर्धशतक झळकावलं तर मी राजीनामा देईल.” असं लिहिलं होतं. यानंतर सोशल मीडियावर त्याच्या राजीनाम्याची चर्चा रंगली असून नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया नोंदवत आहेत. कारण हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात हार्दीक पंड्याने ४२ चेंडूत ५० धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत ४ चौकार आणि १ षटकाराचा समावेश आहे. त्यामुळे हार्दिकचं अर्धशतक होताच हातात पोस्टर घेऊन राजीनाम्याचा दावा करणारी व्यक्ती ट्रोल होऊ लागली आहे.

गुजरातने दिलेले १६२ धावांचे लक्ष्य हैदराबादने आठ गडी आणि पाच चेंडू राखून गाठले. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने मोठी खेळी करत संघासाठी मोठी धावसंख्या निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. हैदराबादच्या सलामीवीरांनी ६१ धावांची भागिदारी केल्यामुळे त्यांचा विजय सोपा झाला.