इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) या सिझनमध्ये गोलंदाजांपैकी उमरान मलिक हा वेगवान गोलंदाज सर्वात जास्त चर्चेत राहिला. त्याने ताशी १५७ किलो मीटर वेगाने चेंडू फेकला होता. हा आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात वेगवान चेंडू ठरला. वेगवान गोलंदाजांच्या तुलनेत फिरकी गोलंदाजांचा वेग फार कमी असतो. मात्र, बुधवारी (२४ मे) झालेल्या गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सच्या क्वॉलिफायर १ सामन्यात एका फिरकी गोलंदाजाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. रविचंद्रन अश्विन असे या गोलंदाजाचे नाव आहे. भारतीय क्रिकेट संघातील वरिष्ठ खेळाडू असलेल्या अश्विन राजस्थान रॉयल्स संघाकडून आयपीएल खेळत आहे. गुजरात विरुद्धच्या सामन्यात त्याने चक्क ताशी १३१.१ किलो मीटर वेगाने चेंडू फेकल्याचे दिसल्याने जोरदार चर्चा सुरू झाली.

फिरकी गोलंदाज असलेल्या रविचंद्रन अश्विन राजस्थान रॉयल्ससाठी साखळी सामन्यांमध्ये प्रसंगी अष्टपैलू कामगिरी केली आहे. त्याने १४ साखळी सामन्यांमध्ये ७.१४ च्या इकॉनॉमीसह ११ बळी घेतले तर ३०.५० च्या सरासरीने १८३ धावा केल्या. विशेष म्हणजे या धावा करताना त्याचा स्ट्राईक रेट १४६.४० इतका जबरदस्त होता. मात्र, क्वॉलिफायर १ सामन्यात त्याला विशेष कामगिरी करता आली नाही. अश्विनने चार षटकात ४० धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही. असे असूनही तो लोकांच्या चर्चेचा विषय ठरला.

गुजरातची फलंदाजी सुरू असताना आठवे षटक टाकण्याची जबाबदारी रविचंद्रन अश्विनवर देण्यात आली होती. अश्विनने या षटकातील तिसरा चेंडू फेकल्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. त्याने फेकलेल्या चेंडूचा वेग ताशी १३१.१ किलो मीटर असल्याचे दाखवलं गेलं. एका फिरकी गोलंदाजाकडून अशा वेगाची अपेक्षा नसते. त्यामुळं सर्वजण आश्चर्यचकित झाले. स्पीडोमीटरमधील बिघाडामुळे चेंडूचा वेग असा दाखवण्यात आल्याचे नंतर लक्षात आले.

या घटनेचे स्क्रिनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही क्रिकेट चाहत्यांनी रविचंद्रन अश्विनची तुलना माजी पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरसोबतही केली आहे. स्पीडोमीटरच्या चुकीमुळे का होईना काही काळासाठी चाहत्यांनी अश्विनला वेगवान गोलंदाजाचा मान दिला.