आयपीएल २०२४ चा ६८वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात अटीतटीचा सामना सुरू आहे. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसला बाद करण्याच्या पद्धतीवर बराच गदारोळ सुरू आहे. डुप्लेसिस ज्या प्रकारे बाद झाला, त्यामुळे या हंगामात केलेल्या अंपायरिंगवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया.

मिचेल सँटनर आरसीबीच्या डावातील १३वे षटक टाकत होता. षटकातील शेवटच्या चेंडूवर रजत पाटीदार स्ट्राईकवर होता. पाटीदारने सँटनेरच्या दिशेने सरळ शॉट खेळला. चेंडू सँटनरच्या हाताला लागला आणि नॉन-स्ट्रायकरच्या स्टंपला लागला. नॉन स्ट्रायकर एंडला उभ्या असलेल्या फॅफ डुप्लेसिसने वेळीच बॅट क्रीझवर आणली. मात्र तिसऱ्या पंचानी तपासले असता डुप्लेसिसची बॅट हवेत असल्याचे जाणवले आणि त्याने खेळाडूला आऊट दिले.

फॅफ डू प्लेसिस OUT की NOT OUT?

डुप्लेसिस आणि संघाच्या प्रतिक्रियेवरून बॅट तर पूर्णपणे जमिनीवरच असल्याचे दिसून आले. फॅफला अशारितीने बाद दिल्यानंतर सध्या चांगलाच गोंधळ उडाला आहे. पण त्याची बॅट हवेत आहे की नाही हे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत नव्हते. बाद झाल्यानंतर फाफ डू प्लेसिस निराश दिसत होता, बाद कसं दिलं हेच त्याला कळेना. यानंतर डगआऊटमध्ये बसलेला विराट कोहलीही आश्चर्यचकित दिसला. जणू काही तो हात वर करून पंचांच्या निर्णयावर निराशा व्यक्त करत होता. तर चाहत्यांच्याही विविध प्रतिक्रिया यावर येत आहेत.

आरसीबीच्या कर्णधाराने महत्त्वाच्या सामन्यात आपल्या संघासाठी कर्णधारपदाला साजेशी खेळी खेळली. १३८ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना त्याने ३९ चेंडूंचा सामना करत ५४ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ३ चौकार आणि ३ षटकार मारले.

प्रथम फलंदाजी करताना RCB संघाने २१८ धावांची डोंगराएवढी धावसंख्या उभारली. फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहलीने संघाला दमदार सुरुवात करून दिली. कोहलीला आपले अर्धशतक पूर्ण करता आले नाही आणि तो ४७ धावा करून बाद झाला. कर्णधार डू प्लेसिसने ५४ धावांचे योगदान दिले. रजत पाटीदारने २३ चेंडूत ४१ धावा केल्या. कॅमेरून ग्रीन शेवटपर्यंत नाबाद राहिला आणि त्याने ३८ धावा केल्या. सीएसकेकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक २ विकेट घेतले. मिचेल सँटनर आणि तुषार देशपांडे यांनी १-१ विकेट घेतली.