इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जवर चार गडी राखून मात केली. या विजयासह राजस्थानने गुणतालिकेत सहाव्या स्थानी झेप घेतली. राजस्थानसाठी हा विजय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. राजस्थानच्या या विजयाची कारणे नेमकी काय आहेत, याचा घेतलेला हा आढावा….

जॉस बटलर
चेन्नईचे १७७ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी राजस्थान रॉयलकडून जॉस बटलर सलामीला आला. जॉस बटलरने एकतर्फी खिंड लढवून संघाला विजय मिळवून दिला. राजस्थानची सलामीची जोडी ४८ धावांवर फोडण्यात यश आले. स्ट्रोक्स ११ धावांवर माघारी परतला. ४८ धावांच्या भागीदारीत बटलरचे योगदान होते १७ चेंडूत ३७ धावांचे. यानंतर अजिंक्य रहाणे (४ धावा), संजू सॅमसन (२१ धावा) आणि प्रशांत चोप्रा (८ धावा) हे तिघेही माघारी परतले. यामुळे राजस्थानची अवस्था ४ बाद १०९ अशी होती. पण बटलरने दुसऱ्या बाजूने खंबीरपणे खिंड लढवली. स्टुअर्ट बिन्नी (२२ धावा) आणि कृष्णप्पा गौथमच्या (१३ धावा) या दोघांनी त्याला साथ दिली. बटलरने ६० चेंडूत नाबाद ९५ धावा केल्या. यात ११ चौकार आणि २ षटकांराचा समावेश होता.

कृष्णप्पा गौतम
कृष्णप्पा गौतम पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्सच्या मदतीला धावून आला. स्टुअर्ट बिन्नी बाद झाल्यावर कृष्णप्पा गौतम मैदानात आला. संघाला १२ चेंडूत २८ धावांची आवश्यकता होती. डेव्हिड विली १९ वे षटक टाकत होता. पहिल्या चेंडूवर बटलरने एक धाव काढली. विलीच्या दुसऱ्या चेंडूचा सामना गौतम करत होता. या चेंडूवर गौतमने षटकार ठोकला आणि संघावरील दबाव कमी केला. यानंतर विलीने वाईड चेंडू टाकला. तिसऱ्या चेंडूवर गौतमला एकच काढता आली. बटलरने चौथ्या चेंडूवर एक धाव काढली. पाचव्या आणि महत्त्वाच्या चेंडूवर गौतमने पुन्हा षटकार ठोकला आणि संघाच्या आशा पल्लवित केल्या. याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर गौतम बाद झाला. पण त्याने त्याचे काम पूर्ण केले होते. या षटकांत राजस्थानला १६ धावा मिळाल्या. यात चार चेंडूत गौतमने १३ धावा केल्या. यात दोन षटकारांचा समावेश होता. शेवटच्या षटकात संघाला विजयासाठी १२ धावा हव्या होत्या. बटलरसारखा स्थिरावलेला फलंदाज मैदानात असल्याने त्याने हे आव्हान सहज पूर्ण केले.

तीन सुटलेले झेल
सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांना तीन वेळा जीवनदान मिळाले. १५ व्या षटकात शेन वॉटसनने बटलरचा झेल सोडला. यानंतर ब्राव्होच्या गोलंदाजीवरही बटलरला नशिबाने साथ दिली. बटलरने मारलेला चेंडू गोलंदाजाच्या डोक्यावरुन गेला. ब्राव्होने उडी मारुन झेल घेण्याचा प्रयत्न केला खरा पण चेंडूपर्यंत त्याचा हात पोहोचू शकला नाही. याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर धोनीने झेल सोडला. धोनीच्या डाव्या बाजूला चेंडू होता. धोनीने झेप घेत झेल घेण्याचा प्रयत्न केला. पण तो अयशस्वी ठरला आणि बटलरला पुन्हा नशिबाने साथ दिली. हा चौकार गेला नाही, पण बटलरची विकेट गेली नाही हे देखील तितकेच महत्त्वाचे होते.

राजस्थानच्या गोलंदाजांची कमाल
चेन्नईची फलंदाजी भक्कम आहे. धोनी, ब्राव्हो, सॅम बिलिंग्स असे फलंदाज त्यांच्याकडे होते. पण १४ ते १९ या महत्त्वाच्या षटकांमध्ये चेन्नईला सात विकेट हातात असूनही फक्त ४५ धावाच करता आल्या. बेन स्ट्रोक्स, जयदेव उनादकट आणि आर्चर या तिघांनी चेन्नईच्या फलंदाजांवर लगाम लावला. यामुळे धोनी आणि बिलिंग्स या दोघांनीही फटकेबाजीची संधीच मिळाली नाही. त्या दोघांना या सहा षटकांत फक्त तीन चौकार मारता आले. त्यामुळे चेन्नईला १८० धावांच्या आत रोखण्यात गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका निभावली.