RCB Special Instagram Story Ahead Of IPL 2025 Final: आयपीएल २०२५ स्पर्धेतील फायनलचा सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यात पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ८ वर्षांनंतर आयपीएल स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर पंजाब किंग्ज संघाने ११ वर्षांनंतर आयपीएलची फायनल गाठली आहे. मात्र, दोन्ही संघांना एकदाही आयपीएलची ट्रॉफी उंचावता आलेली नाही. आज आयपीएलमध्ये इतिहास घडणार आहे. कारण या स्पर्धेला नवा विजेता मिळणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने एक स्टोरी शेअर केली आहे, जी सध्या तुफान चर्चेत आहे.
विराट कोहली गेल्या १८ वर्षांपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळत आहे. या संघात ख्रिस गेल, एबी डिव्हिलिएर्स, डॅनियम विट्टोरी आणि अनिल कुंबळेसारखे दिग्गज खेळून गेले, मात्र या संघाला आयपीएलची ट्रॉफी जिंकता आलेली नाही. याआधी २०१६ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र, या संघाला अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी रजत पाटीदारकडे सोपवण्यात आली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पहिल्याच प्रयत्नात फायनलमध्ये प्रवेश केला आहे. यासह या संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार देखील मानलं जात आहे.
आयपीएल फायनलआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची खास इन्स्टाग्राम स्टोरी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या जर्सीचा फोटो शेअर केला आहे. या जर्सीवर गणपत्ती बाप्पाची मूर्ती देखील आहे. ही स्टोरी सध्या तुफान चर्चेत आहे.
रॉयस चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएल क्वालिफायर १ मध्ये पंजाब किंग्ज संघाला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.या संघाने साखळी फेरीतील १४ पैकी ९ सामन्यांमध्ये विजय मिळवला होता. १८ गुणांसह हा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे.
या स्पर्धेसाठी असा आहे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ:
रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, यश दयाल, लियाम लिव्हिंगस्टोन, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, जोश हेझलवूड, रसिक सलाम दार, सुयश शर्मा, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, स्वप्नील सिंग, टीम डेव्हिड, नुवान तुषारा, जेकब बॅथेल, मनोज भंडागे, देवदत्त पडिक्कल, स्वास्तिक चिकारा,लुंगी एनगिडी, अभिनंदन सिंग, मोहित राठी, रोमारियो शेफर्ड