पीटीआय, नवी मुंबई
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये मंगळवारी लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु हे संघ आमनेसामने येणार असून दोन्ही संघांचे विजयी घोडदौड राखण्याचे लक्ष्य असेल.
केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ आणि फॅफ डय़ूप्लेसिसच्या नेतृत्वाखालील बंगळूरुने गेल्या सामन्यात अनुक्रमे मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यावर मात केली. दोन्ही संघांनी यंदाच्या ‘आयपीएल’ हंगामात दर्जेदार कामगिरी करताना सहापैकी चार सामने जिंकले असून त्यांच्या खात्यावर आठ गुण आहेत. त्यामुळे हा सामना जिंकणारा संघ गुणतालिकेत आगेकूच करेल.
नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत दोन्ही संघांना दवाचाही सामना करावा लागेल.
कार्तिक, कोहली, फॅफकडे लक्ष
बंगळूरुच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांच्या कामगिरीत सुधारणा गरजेची आहे. कर्णधार फॅफला पहिल्या लढतीनंतर धावांसाठी झगडावे लागले आहे. विराट कोहलीलाही लौकिकाला साजेसा खेळ करता आलेला नाही. मात्र मधल्या फळीत ग्लेन मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिक हे अनुभवी फलंदाज चांगले योगदान देत आहेत. मॅक्सवेलने दिल्लीविरुद्धच्या गेल्या सामन्यात ३४ चेंडूंत ५५ धावांची खेळी केली होती. कार्तिकनेही या सामन्यात अर्धशतक झळकावले. बंगळूरुच्या आतापर्यंतच्या यशात कार्तिकने (सहा सामन्यांमध्ये १९७ धावा) महत्त्वाची भूमिका बजावली आहे. डावखुऱ्या शाहबाज अहमदने आपल्या फलंदाजीने प्रभावित केले आहे. गोलंदाजीत जोश हेझलवूडने दिल्लीविरुद्ध चार बळी मिळवले. त्याला मोहम्मद सिराज, हर्षल पटेल आणि वािनदू हसरंगाची साथ लाभते आहे.
राहुल, डीकॉकवर भिस्त
लखनऊचा कर्णधार राहुलने आतापर्यंत २३५ धावा केल्या आहेत. त्याने मुंबईविरुद्धच्या गेल्या सामन्यात नाबाद शतकी खेळी केली. तो यंदा सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरनंतर दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचा सलामीचा साथीदार क्विंटन डीकॉकलाही सूर गवसलेला आहे. मधल्या फळीत युवा फलंदाज आयुष बदोनी, दीपक हुडा आणि कृणाल पंडय़ा आक्रमक खेळी करण्यात सक्षम आहेत. जेसन होल्डर आणि मार्कस स्टोइनिस या अष्टपैलू खेळाडूंमुळे लखनऊच्या संघाला बळकटी मिळाली आहे. तसेच गोलंदाजीची भिस्त वेगवान गोलंदाज आवेश खान आणि फिरकीपटू रवी बिश्नोई यांच्या खांद्यावर असेल.
* वेळ : सायं. ७.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्यांवर)