Chennai Super Kings vs Gujarat Titans Highlights, IPL 2023 Final Updates: चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएलच्या 16व्या हंगामाचा अंतिम सामना रविवारी (२८मे) पावसामुळे होऊ शकला नाही. आता सोमवारी राखीव दिवशी चॅम्पियनचा निर्णय होणार आहे. संततधार पावसामुळे रविवारी नाणेफेकही होऊ शकली नाही. पावसामुळे स्टेडियमचे तलावात रुपांतर झाले. दोन्ही संघांचे प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्याशी बोलून पंचांनी आजचा सामना न करण्याचा निर्णय घेतला. आयपीएल इतिहासात प्रथमच आयपीएल अंतिम सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. सायंकाळी सात वाजता नाणेफेक होऊन ७.३० वाजता सामना सुरू होणे गरजेचे होते. मात्र, सायंकाळी सहा वाजल्यापासून अहमदाबादमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे सर्व खेळाडू व कर्मचारी पाऊस थांबण्याची वाट पाहत होते. नऊ वाजण्याच्या सुमारास काही मिनिटांसाठी पाऊस थांबला. मैदान कर्मचाऱ्यांनी मैदान सुकवण्याचा प्रयत्न केला असतानाच पुन्हा पावसाला सुरुवात झाली. हा सामना ९.३० वाजेपर्यंत सुरू झाला असता तर संपूर्ण वीस षटकांचा खेळ पाहण्यास मिळाला असता. मात्र, मैदान खेळण्यासाठी तयार न झाल्याने सामन्यातील षटके कमी करण्यात आली. हा सामना दहा वाजेपर्यंत सुरू झाल्यास प्रत्येकी १७ षटकांचा खेळ होईल असे सांगण्यात आले. तर १०.३० पर्यंत खेळ सुरू झाल्यास प्रत्येकी १५ षटकांचा खेळ होणार होता. तसेच ११ वाजण्याच्या पुढे खेळ सुरू झाल्यास १२ षटकांचा खेळ होणार होता. मात्र, तसे काहीही झाले नाही. या व्यतिरिक्त १२ वाजण्याच्या पुढे खेळ सुरू न झाल्यास सोमवारी हा अंतिम सामना खेळण्यात येईल. सोमवारी देखील खेळ न झाल्यास दोन्ही संघांना संयुक्तपणे विजेतेपद देण्यात येईल. अंपायरने दिले मोठे अपडेट समालोचक सायमन डूल यांच्याशी झालेल्या चर्चेत अंपायर नितीन मेनन आणि रॉड टकर म्हणाले, “रात्री नऊच्या सुमारास परिस्थिती चांगली होती. तीन तासांच्या पावसानंतरही आम्ही खूप आशावादी होतो पण दुर्दैवाने पाऊस पुन्हा आला. आम्ही रात्री उशिरा १२.०६ पर्यंत सामना सुरू करू शकतो. मैदान आणि खेळपट्टी कोरडी करण्यासाठी ग्राउंड्समनला किमान एक तास लागतो. रात्री ११ वाजेपर्यंत पाऊस थांबला नाही त्यामुळे उद्या (सोमवारी) पुन्हा येऊ.”