Gujarat Titans vs Lucknow Super Giants Highlights: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये हाय व्होल्टेज सामना पार पडला. लखनऊ सुपर जायंट्सने गुजरात टायटन्स संघासमोर विजयासाठी २३६ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना गुजरातच्या फलंदाजांनी पूर्ण जोर लावला. पण लखनऊच्या गोलंदाजांनी गुजरातला २०२ धावांवर रोखलं. यासह लखनऊ सुपर जायंट्सने हा सामना ३३ धावांनी आपल्या नावावर केला. गुजरातच्या पराभवासह पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला गुणतालिकेत टॉप २ मध्ये जाण्याची सुवर्णसंधी आहे.

गुजरात टायटन्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी २३६ धावा करायच्या होत्या. हे आव्हान मुळीच सोपं नव्हतं. इतक्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातला चांगल्या सुरुवातीची गरज होती. मात्र, या सामन्यात गुजरातच्या सलामी जोडीला हवी तशी सुरूवात करता आली नाही. साई सुदर्शन १६ चेंडूत २१ धावा करत माघारी परतला. तर कर्णधार शुबमन गिल २० चेंडूत ३५ धावा खर्च करत माघारी परतला.

सलामी जोडी तंबूत परतल्यानंतर जोस बटलरवर संघाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी होती. मात्र, तो देखील ३३ धावांवर माघारी परतला. शेवटी शेरफेन रुदरफोर्ड आणि शाहरुख खानने मोठे फटके मारले आणि संघाला विजयाच्या जवळ पोहोचवलं. पण शाहरूख खान ५७ तर रुदरफोर्ड ३८ धावांवर माघारी परतला.

लखनऊ सुपर जायंट्सने उभारला २३५ धावांचा डोंगर

या सामन्यात गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी एडन मार्करम आणि मिचेल मार्शची जोडी मैदानावर आली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ९१ धावा चोपल्या. एडन मार्करमने २४ चेंडूंचा सामना करत ३६ धावांची खेळी केली. तर मिचेल मार्शने ६४ चेंडूत ११७ धावांची खेळी केली.

या खेळीदरम्यान त्याने १० चौकार आणि ८ षटकार खेचले. शेवटी निकोलस पूरन आणि ऋषभ पंतने मिळून गुजरातच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. निकोलस पूरनने २७ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांचा साहाय्याने ५६ धावांची खेळी केली. तर ऋषभ पंतने नाबाद १६ धावा केल्या. या खेळीच्या बळावर लखनऊने २ गडी बाद २३५ धावांचा डोंगर उभारला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.