Gujarat Titans Team Bus Short Circuit: आयपीएलच्या अंतिम सामन्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागल्यानंतर, गुजरात टायटन्सच्या खेळाडूंना आणखी एका मोठ्या प्रसंगाला सामोरे जावे लागले. फायनल मॅच संपवून हॉटेलकडे परतत असताना गुजरात टायटन्सच्या संघ बसमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्याची धक्कादायक घटना घडली.
बसमध्ये पसरला धूर…खेळाडूंना सुखरूप बाहेर काढले
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमधील इलेक्ट्रिकल बिघाडामुळे अचानक शॉर्ट सर्किट झाले आणि पाहता पाहता गाडीच्या आत मोठ्या प्रमाणावर धूर पसरला. धूर दिसताच बस चालकाने तात्काळ गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. सुदैवाने, व्यवस्थापनाच्या प्रसंगावधानाने सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला कोणतीही दुखापत न होता तातडीने सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. दुसरी व्यवस्था होईपर्यंत खेळाडूंना काही काळ रस्त्याच्या कडेलाच थांबून राहावे लागले. त्यानंतर तातडीने दुसऱ्या बसची सोय करून खेळाडूंना हॉटेलकडे रवाना करण्यात आले.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरून हॉटेलकडे जात असताना हा अपघात घडला. बसच्या वायरिंगमध्ये ‘शॉर्ट सर्किट’ झाल्यामुळे ही आग लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. बसमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने तत्परता दाखवत बस थांबवली. सर्व खेळाडू आणि स्टाफला तातडीने सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले. या घटनेमुळे गुजरातचे खेळाडू जवळपास पाऊण ते एक तास रस्त्यावरच अडकून पडले होते. त्यानंतर दुसऱ्या बसची व्यवस्था करून त्यांना हॉटेलकडे रवाना करण्यात आले.
मैदानावर पराभव, मैदानाबाहेर मनस्ताप!
गुजरात टायटन्ससाठी हा संपूर्ण रात्र कमालीची निराशाजनक ठरली. आयपीएलच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुने गुजरातचा ५ गड्यांनी पराभव केला. या पराभवामुळे गुजरात टायटन्सचे दुसऱ्यांदा आयपीएल जेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले. संपूर्ण हंगामात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुजरातच्या मोहिमेचा शेवट अत्यंत वेदनादायक झाला, त्यातच बसच्या या घटनेने खेळाडूंचा मनस्ताप आणखी वाढवला.
प्रवासाचा थकवा नडला?
गुजरात टायटन्सच्या या पराभवामागे संघाचा अत्यंत व्यस्त आणि थकवणारा प्रवास कारणीभूत असल्याचीही चर्चा आहे. २९ मे रोजी धरमशाला येथून क्वालिफायर-२ सामन्यासाठी संघ मुल्लानपूरला पोहोचला होता. तिथून राजस्थान रॉयल्सचा पराभव केल्यानंतर, ३० मे रोजी खराब हवामानामुळे अहमदाबादसाठीचे त्यांचे विमान उशिराने उडाले. त्यामुळे शनिवारी उशिरा रात्री खेळाडू कसाबसा अहमदाबादमध्ये पोहोचले होते.
थकव्याचे कारण देणे अयोग्य- विक्रम सोळंकी
या व्यस्त वेळापत्रकामुळे आणि प्रवासाच्या थकव्यामुळे अंतिम सामन्यात गुजरातची कामगिरी सुमार झाली का? असा प्रश्न विचारला असता, गुजरात टायटन्सचे क्रिकेट संचालक विक्रम सोळंकी यांनी याचे कोणतेही सोंग घेण्यास नकार दिला. सामन्यांनंतर बोलताना सोळंकी म्हणाले, “आम्ही सलग सामने खेळलो किंवा खेळाडू थकले होते, असे सांगून मला आरसीबीच्या विजयाचे महत्त्व कमी करायचे नाही. त्यांनी अप्रतिम खेळ केला. आमची धावसंख्या नक्कीच कमी होती, पण आमच्या गोलंदाजांनी ती वाचवण्यासाठी शेवटपर्यंत झुंज दिली. विजयाचे पूर्ण श्रेय आरसीबीलाच जाते.”
