मुंबई इंडियन्स संघाला पाच जेतेपदं मिळवून देणारा माजी कर्णधार रोहित शर्माला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून संघात समाविष्ट करण्यावरून अंबाती रायुडू आणि संजय बांगर यांच्यात जुगलबंदी पाहायला मिळाली.
हार्दिक पंड्या स्वतंत्रपणे कर्णधारपद हाताळू शकतो. त्याला रोहित शर्माच्या सल्ल्याची गरज नाही असं मत माजी खेळाडू अंबाती रायुडू याने व्यक्त केलं. दुसरीकडे संजय बांगर यांनी वेगळं मत मांडलं. रोहितकडे ट्वेन्टी२० क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्याचा अनुभव हार्दिकला उपयोगी ठरू शकतो त्यामुळे तो संघात असणं आवश्यक आहे असं बांगर म्हणाले.
ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना बांगर म्हणाले, मुंबई इंडियन्स संघव्यवस्थापनाने ३७वर्षीय रोहितच्या अनुभवाचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करून घ्यायला हवा. जेणेकरून कठीण कालखंडात हार्दिकला रोहितच्या अनुभवाचा फायदा होईल. पण रायुडू यांनी यासंदर्भात वेगळं मत मांडलं. कर्णधाराने एकट्याने स्वतंत्रपणे निर्णय घ्यावेत. त्याला मोकळीक असावी. या मुद्यावरून दोघांमध्ये चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली. चर्चेच्या अंती बांगर यांनी रायुडू यांना शेलकी टोलाही लगावला. तुला ही परिस्थिती कळणार नाही कारण तू आयपीएल संघाचं नेतृत्व केलेलं नाहीस असं बांगर म्हणाले.
या दोघांमध्ये नेमका काय संवाद झाला जाणून घेऊया
बांगर- रायुडू तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. रोहित इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळत असल्यामुळे तो एक डाव मैदानावर नसतो. त्याची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवते आहे. तो हार्दिकला चांगलं मार्गदर्शन करू शकतो.
रायुडू- हार्दिकला रोहितच्या सल्ल्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. कर्णधाराला निर्णयाचं स्वातंत्र्य मिळणं गरजेचं आहे. हा त्याचा संघ आहे. दहाजण १० गोष्टी सांगू लागले तर कठीण होऊ शकतं. रोहित शर्मा भारताचा कर्णधार आहे, तो कर्णधारपद हाताळत असताना कोणी त्याला सल्ला देण्याची गरज नाही. आता मुंबई इंडियन्सच्या संदर्भात हार्दिक कर्णधार आहे. त्याला कोणीही सल्ला देऊ नये, तो योग्य निर्णय घेऊ शकतो.
बांगर- मला असं वाटतं
रायुडू- कर्णधाराला मोकळीक असावी.
बांगर- इम्पॅक्ट प्लेयर म्हणून एखाद्या खेळाडूला समाविष्ट केलं जातं तेव्हा तो विशेषज्ञ म्हणून येतो. मुंबईकडे नमन धीर, तिलक वर्मा हेही आहेत. तेही गोलंदाजी करत नाहीत. टी२० प्रकारात रोहितचा अनुभव संघाच्या कामी येऊ शकतो. तुम्हाला कदाचित हे लक्षात येणार नाही कारण तुम्ही आयपीएल संघाचं नेतृत्व केलं नाहीये. रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघाने ५ जेतेपदं पटकावली आहेत.
रायुडू- पण तो आता कर्णधार नाही. आता हा हार्दिकचा संघ आहे. आपण आता या वादात पडायला नको. रोहित हा एक मोठा कर्णधार आहे. आपल्या सगळ्यांनाच ते माहिती आहे. पण आता मुंबई इंडियन्सचं नेतृत्व रोहितच्या नव्हे तर हार्दिकच्या हाती आहे. संघासाठी जे योग्य असेल ते तो करेल. रोहित जेव्हा त्याला वाटेल तेव्हा सल्ला देऊच शकतो. त्याला मैदानावर असण्याची आवश्यकता नाही.
बांगर- माजी कर्णधाराकडून संदेश येत नाहीत, संघव्यवस्थापनाकडून दिले जातात.
हे संभाषण सुरू असतानाच निवेदकाने मुंबई इंडियन्स संघात सूर्यकुमार यादवही असल्याचंही सांगितलं. सूर्यकुमार भारताच्या टी२० संघाचा कर्णधार आहे. तोही हार्दिकला योग्य सल्ला देऊ शकतो. आरसीबी संघाचं नेतृत्व रजत पाटीदारकडे आहे. पण अनुभवी विराट कोहली त्याला योग्यवेळी सल्ला देत असतो.