Hardik Pandya, Rohit Sharma Emotional Video: आयपीएल २०२५ स्पर्धेतील क्वालिफायर २ चा सामना पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्जने बाजी मारत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पंजाबकडून खेळताना कर्णधार श्रेयस अय्यरने एकाकी झुंज दिली. या पराभवानंतर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. भावूक झालेल्या हार्दिकला जसप्रीत बुमराह धीर देताना दिसून आला. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाला या हंगामात हवी तशी सुरूवात करता आली नव्हती. हंगामातील सुरूवातीचे काही सामने गमावल्यानंतर असं वाटू लागलं होतं की, मुंबईचा संघ यावेळीही तळाशी राहणार. मात्र, मुंबईने दमदार कमबॅक केलं आणि क्वालिफायर २ पर्यंतचा प्रवास केला. अंतिम फेरीत जाण्याची संधी असताना, मुंबईचा संघ कुठेतरी कमी पडला. त्यामुळे मुंबईला हा सामना ५ गडी राखून गमवावा लागला. हातचा सामना निसटल्यानंतर रोहित, हार्दिकपासून ते सर्व खेळाडू भावूक झाले होते.
मुंबईने या हंगामात शोधून काढलेल्या वेगवान गोलंदाज अश्वनी कुमारला देखील या सामन्यानंतर अश्रू अनावर झाले. हा सामना गमावताच हार्दिक पांड्या मैदानावरच बसला. त्याला अश्रू अनावर झाले. गेल्या दोन महिन्यांची मेहनत एका सामन्यामुळे व्यर्थ गेली. भावूक झालेल्या हार्दिक पांड्याला जसप्रीत बुमराह धीर देताना दिसून आला. तर रोहित शर्मा देखील भावूक झाला होता. या सामन्यानंतर मुंबईच्या खेळाडूंचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. मुंबई इंडियन्स संघाची मालकीण नीता अंबानींचा एक फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, या फोटोत त्या डोक्याला हात लावून बसल्याचं दिसून येत आहे.
पंजाबजा दमदार विजय
या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आला. मुंबई इंडियन्सकडून फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवने ४४ आणि तिलक वर्माने देखील ४४ धावांची खेळी केली. तर जॉनी बेअरस्टोने ३८ धावांची दमदार खेळी केली.
या खेळीच्या बळावर मुंबई इंडियन्सने २० षटकांअखेर ६ गडी बाद २०३ धावांचा डोंगर उभारला. पंजाब किंग्ज संघाला हा सामना जिंकण्यासाठी २०४ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना कर्णधार श्रेयस अय्यर शेवटपर्यंत उभा राहिला. श्रेयस अय्यरने ४१ चेंडूंचा सामना करत नाबाद ८७ धावांची खेळी केली. तर नेहाल वढेराने ४८ धावांची खेळी केली. जोश इंग्लिशने ३८ धावांची खेळी केली. पंजाबने हा सामना ५ गडी राखून जिंकला. या स्पर्धेतील अंतिम फेरीतील सामना पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना ३ जून रोजी रंगणार आहे.