GT vs RCB: गुजरात टायटन्सने शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सहा गडी राखून पराभव केला. विराट कोहली फॉर्मात परतला असतानाही ,त्याने अर्धशतक झळकावले असतानाही गुजरात टायटन्सने बाजी मारली. हार्दिक पंड्याने आपल्या संघाचा विजय गुजरातच्या जनतेला समर्पित केला.

काय म्हणाला हार्दिक पंड्या

आपल्या संघाच्या विजयावर प्रतिक्रिया देताना, गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या म्हणाला, “हेच या संघाचे सौंदर्य आहे, लोक येतात आणि क्लचच्या परिस्थितीत ते काय करू शकतात हे दाखवून देणे ही एक सवय होत चालली आहे.” तो पुढे म्हणाला, “त्यांच्या आत्मविश्वासाच्या लेव्हलचे श्रेय, त्यांच्यात असलेला आत्मविश्वास, ते गेम पूर्ण करू शकतील याची खात्री करून देतात.”

सामना गुजरातच्या जनतेला समर्पित

हार्दिक पांड्या, जो स्वतः गुजरातचा आहे, त्याने हा विजय गुजरातच्या जनतेला समर्पित केला. तो म्हणाला, “हा विजय गुजरातच्या लोकांना समर्पित आहे, कारण उद्या गुजरात दिन आहे, तुम्ही आमच्यावर दाखवलेल्या सर्व प्रेम आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद. मी महाराष्ट्रात खूप खेळलो आहे म्हणून महाराष्ट्र दिनाच्याही शुभेच्छा.”

‘असा’ रंगला सामना

प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली फॉर्ममध्ये परतल्याने आरसीबीने २० षटकांत ६ बाद १७० धावा केल्या. आरसीबीसाठी डावाची सुरुवात करणाऱ्या भारताच्या माजी कर्णधाराने ५३ चेंडूत ५८ धावा केल्या. रजत पाटीदारने ३२ चेंडूत ५२ धावा केल्या. गुजरात टायटन्सने तीन चेंडू राखून लक्ष्य गाठले.