MI vs PBKS Hardik Pandya Fined: पंजाब किंग्सच्या हातातून सामना खेचून आणल्यावर आनंद साजरा करत असतानाच मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराला बीसीसीआयने दंड ठोठवल्याचे समजतेय. आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी मुंबई इंडियन्स दोषी आढळल्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्याला त्याची भरपाई करावी लागली. गुरुवारी मुल्लापूर येथे आयपीएल २०२४ च्या सामन्यात पंजाब किंग्जविरुद्ध सामन्यानंतर एमआयच्या कर्णधाराला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला.

हार्दिक पांड्याला दंड का ठोठावला?

सामन्यानंतर बीसीसीआयने शेअर केलेल्या प्रेसरिलीजमध्ये म्हटल्याप्रमाणे, “मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याला १८ एप्रिल रोजी मुल्लापूर येथील PCA न्यू इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर पंजाब किंग्ज विरुद्ध इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०१२४ च्या सामन्यात स्लो ओव्हर रेट राखल्यामुळे दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलच्या किमान ओव्हर रेट नियमांच्या संबंधित आचारसंहितेअंतर्गत हा त्याच्या संघाचा हंगामातील पहिला गुन्हा असल्याने, पंड्याला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.”

सध्या हे प्रकरण दंड भरून नियंत्रणात आलं असलं तरी या स्लो ओव्हर रेटमुळे MI ने PBKS विरुद्धचा सामना जवळपास गमावलाच होता. कट ऑफ टाइम कमी पडल्याने एमआयला सामन्याच्या निर्धारित वेळेत षटकं न टाकल्यामुळे मुंबई इंडियन्स संघाला शेवटच्या दोन षटकात ३० गज वर्तुळाबाहेर (३० यार्ड सर्कल) चारच क्षेत्ररक्षक तैनात करता आले.

मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स मॅच हायलाईट्स (MI vs PBKS Highlights)

दरम्यान, मुंबई इंडियन्सचा कालच्या सामन्यातील खेळ खरोखरच चाहत्यांच्या आशा पल्लवित करणारा होता. पंजाबला १२ चेंडूत २३ धावांची गरज असताना हार्दिक आणि वेगवान गोलंदाज आकाश मढवालने एमआयची बाजू उचलून धरली. हार्दिकने पहिल्या तीन चेंडूत फक्त चार धावा दिल्या आणि चौथ्या चेंडूवर हरप्रीत ब्रारची महत्त्वाची विकेट घेतली. पीबीकेएस मधील ११ व्या क्रमांकावर खेळणारा कागिसो रबाडाने मैदानात येताच पहिल्या चेंडूवर षटकार ठोल्यावर मात्र सामन्याचं पारडं एकाक्षणी मुंबईकडे पुढच्याच क्षणी पंजाबच्या दिशेने झुकत होतं.

हे ही वाचा<< रोहित शर्माचं मुंबई इंडियन्सच्या कॅप्टन्सीबाबत पहिल्यांदाच स्पष्ट विधान; म्हणाला, “संघात नवीन आलेल्यांनी माझे विचार..”

पंजाबला शेवटच्या षटकात १२ धावांची गरज होती. मढवालने षटकाची सुरुवात वाईडने केली. पुढचा बॉल पुन्हा एकदा फुल आणि वाईड होता पण रबाडाची बॅट त्यावेळी चालली आणि बॉल डीपकडे गेला. त्यावेळी नबीने विजेच्या वेगाने बॉल पकडून स्ट्रायकरच्या दिशेने फेकला. खरंतर रबाडा यावेळी स्ट्राईक घेण्यासाठी चपळाईने धावला पण त्याआधीच ईशान किशनने त्याला धावबाद केले होते. यातही गंमत म्हणजे रबाडा पोहोचण्याच्या आधी ईशानने स्टंप उडवलाय यावर मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना सुद्धा विश्वास नव्हता, पण मग रिप्लेमध्ये जेव्हा हे सिद्ध झालं तेव्हा मुंबईच्या खेळाडूंचा आनंद गगनात मावेनासा होता.