IPL 2025 Hardik Pandya Statement on Jasprit Bumrah: रोहित शर्माची फलंदाजी आणि जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीसह संघाच्या सांघिक खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने एलिमिनेटर सामन्यात गुजरातवर विजय मिळवला. मुंबईने गुजरातवर २० धावांनी विजय मिळवत त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले आहे. तर मुंबईचा संघ दुसऱ्या क्वालिफायरसाठी पात्र ठरला. हार्दिक पंड्याने मुंबईच्या विजयानंतर बुमराहबाबत मोठं वक्तव्य केलं.
मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २२८ धावा केल्यानंतरही परिस्थिती वाईट होती. साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी ८४ धावांची भागीदारी करत गुजरातच्या विजयाचा मार्ग तयार करत होते. पण जसप्रीत बुमराहने सुंदरला कमाल यॉर्कर टाकत बाद करून सामन्याचा रोख बदलला.
सामन्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याला विचारण्यात आले की तो बुमराहला गोलंदाजीसाठी कधी बोलावायचं हे कसे ठरवतो? हार्दिक म्हणाला की, अगदी सोपं आहे. जेव्हा जेव्हा असं वाटतं की सामना हातून निसटत आहे तेव्हा बुमराहला बोलवायचं. बुमराहने सामन्यात ४ षटकांत २७ धावा देत १ विकेट घेतली.
हार्दिक पंड्या जसप्रीत बुमराहबद्दल म्हणाला, “अगदी सोपं आहे. जेव्हा तुम्हाला वाटतंय की सामना हातून निसटत आहे, तेव्हा बुमराहला बोलावयाचं. बुमराहसारख्या गोलंदाजाचा पर्याय असणं ही एक लक्झरी आहे. तो मुंबईतील घरांच्या किंमतीसारखाच आहे… तो तितकाच मौल्यवान आहे.”
बुमराहला १८ वे षटक टाकायला सांगितल्यावर पंड्या म्हणाला, “मी स्कोअरबोर्ड पाहत होतो आणि मला वाटलं की शेवटी जास्तीच्या धावा ठेवू शकलो तर बरं पडेल, माझ्याकडे इतर गोलंदाजही आहेत. बुमराहने ते (१८वं षटक) षटक टाकणं महत्त्वाचं होतं जेणेकरून धावांचा फरक वाढेल.”
गुजरात टायटन्सला विजयासाठी ३ षटकांत ४५ धावांची गरज होती. बुमराहच्या १८व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर षटकार लगावला, पण तरीही बुमराहने त्या षटकात ९ धावाच दिल्या. अखेरच्या २ षटकांत गुजरातला ३६ धावांची गरज होती आणि बोल्टने पहिल्याच चेंडूवर शेरफन रूदरफोर्डला झेलबाद करत, षटकात १२ धावा दिल्या.
शेवटी गुजरातला ६ चेंडूत २४ धावांची गरज होती, जेव्हा रिचर्ड ग्लीसन गोलंदाजीला आला आणि तो ३ चेंडू टाकून पायाच्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला. त्याने पहिल्या ३ चेंडूवर फक्त ३ धावा दिल्या. उर्वरित ३ चेंडू अश्वनी कुमारने टाकले. त्याने चौथ्या चेंडूवर शाहरूख खानला झेलबाद केलं. पाचवा चेंडू यॉर्कर टाकला, शेवटच्या दोन्ही चेंडूवर राशीदला एकही धाव काढता आली नाही आणि मुंबईने २० धावांनी सामना जिंकला.