scorecardresearch

कर्णधारपदाचा जडेजाच्या कामगिरीवर परिणाम!; चेन्नईच्या प्रमुख अष्टपैलूला पुन्हा लय सापडण्याची धोनीला आशा

कर्णधारपदाचे दडपण आणि त्यासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्यांचा रवींद्र जडेजाच्या वैयक्तिक कामगिरीवर विपरीत परिणाम झाला.

पीटीआय, पुणे : कर्णधारपदाचे दडपण आणि त्यासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्यांचा रवींद्र जडेजाच्या वैयक्तिक कामगिरीवर विपरीत परिणाम झाला. त्यामुळेच त्याने हंगामाच्या मध्यातच कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला, असे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमधील संघ चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने सांगितले.

‘आयपीएल’च्या यंदाच्या हंगामापूर्वी धोनीने चेन्नई संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होत आपला उत्तराधिकारी म्हणून जडेजाची निवड केली होती. मात्र, जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नईला आठपैकी केवळ दोन सामने जिंकता आले.  त्यामुळे त्याने तडकाफडकी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आणि पुन्हा धोनीने चेन्नईच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली.

‘‘यंदाच्या हंगामात चेन्नईचे कर्णधारपद भूषवावे लागणार, हे जडेजाला मागील वर्षीच सांगण्यात आले होते. तो पहिल्यांदाच एखाद्या संघाचे नेतृत्व करत असल्याने पहिल्या दोन सामन्यांत जवळपास सर्व निर्णय मीच घेतले. त्यानंतर मात्र मी त्याला कर्णधार म्हणून सर्व निर्णय स्वत:च घेण्याची आणि त्यासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याची सूचना केली. कर्णधार असताना सर्व दडपणाचा आणि जबाबदाऱ्यांचा जडेजाच्या कामगिरीवर बहुधा विपरीत परिणाम झाला,’’ असे धोनी म्हणाला.

‘‘जडेजाने चेन्नईच्या संघाचे नेतृत्व करावे अशी माझी धारणा होती. त्यामुळे मैदानात मी त्याला सर्व निर्णय घेण्याची सूचना केली. त्याला केवळ नाणेफेकीसाठी मैदानात पाठवले जात आहे आणि सर्व निर्णय दुसराच व्यक्ती घेत आहे, असे हंगामानंतर वाटू नये असा त्यामागे माझा हेतू होता. कर्णधार म्हणून तुम्हीच सर्व निर्णय घेणे आणि ते चूकल्यास त्यांची जबाबदारी स्वीकारणे अत्यंत गरजेचे आहे.’’ असेही धोनीने नमूद केले.         

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Impact of captaincy jadeja performance dhoni hopes regain momentum chennai all rounder ysh

ताज्या बातम्या