पीटीआय, अहमदाबाद : राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु हे बलाढय़ संघ इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये शुक्रवारी ‘क्वालिफायर-२’च्या सामन्यात आमनेसामने येणार असून दोन्ही संघांचे विजयासह अंतिम फेरी गाठण्याचे लक्ष्य असेल. अखेरच्या चारपैकी तीन साखळी सामने जिंकल्यानंतर बंगळूरुने ‘एलिमिनेटर’च्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सला १४ धावांनी पराभूत केले. दुसरीकडे, ‘क्वालिफायर-१’मध्ये गुजरात टायटन्सकडून पराभव पत्करणाऱ्या राजस्थानच्या कामगिरीत सुधारणा गरजेची आहे.

बटलर, सॅमसनवर मदार

राजस्थानच्या फलंदाजीची मदार सलामीवीर जोस बटलर आणि कर्णधार संजू सॅमसनवर आहे. ‘क्वालिफायर-१’च्या सामन्यात बटलर (८९) आणि सॅमसन (४७) यांनी उत्तम खेळी केल्या. मात्र सॅमसनने ३०-४० धावांचे रूपांतर मोठय़ा खेळीत करणे गरजेचे आहे. गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट आणि प्रसिध कृष्णा यांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आहे. त्यामुळे यजुर्वेद्र चहल आणि रविचंद्रन अश्विन या फिरकीपटूंवर अतिरिक्त दडपण आहे.

पाटीदार, हर्षलकडून अपेक्षा

लखनऊविरुद्ध ‘एलिमिनेटर’च्या सामन्यात बंगळूरुकडून नवोदित फलंदाज रजत पाटीदारने ५४ चेंडूंतच नाबाद ११२ धावांची खेळी साकारली. यंदा खेळाडू लिलावात पाटीदारला कोणत्याही संघाने खरेदी केले नव्हते. मात्र, बदली खेळाडू म्हणून त्याची बंगळूरु संघात वर्णी लागली आणि त्याने दडपणात कारकीर्दीला कलाटणी देणारी खेळी केली. त्यामुळे आता पाटीदारकडून अपेक्षा वाढल्या आहेत. बंगळूरुसाठी पाटीदार, डय़ूप्लेसिस, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिक यांचे योगदान महत्त्वाचे ठरेल. बंगळूरुच्या गोलंदाजीची भिस्त प्रामुख्याने हर्षल पटेलवर आहे. त्याला जोश हेझलवूड आणि वानिंदू हसरंगाची साथ मिळणे गरजेचे आहे.

  • वेळ : सायं. ७.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी, सिलेक्ट १ (संबंधित एचडी वाहिन्यांवर)