scorecardresearch

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : गुजरात अंतिम फेरीत; राजस्थानवर सात गडी राखून मात; मिलर, हार्दिक विजयाचे शिल्पकार

कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या या लढतीत १८९ धावांच्या आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग करताना गुजरातची अडखळती सुरुवात झाली.

पीटीआय, कोलकाता : डेव्हिड मिलर (३८ चेंडूंत नाबाद ६८ धावा) आणि कर्णधार हार्दिक पंडय़ा (२७ चेंडूंत नाबाद ४०) यांच्या दिमाखदार खेळींमुळे गुजरात टायटन्सनी मंगळवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमधील ‘क्वॉलिफायर-१’च्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर सात गडी राखून विजय मिळवत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले.

कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या या लढतीत १८९ धावांच्या आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग करताना गुजरातची अडखळती सुरुवात झाली. सलामीवीर वृद्धिमान साहा खाते न उघडताच माघारी परतला. यानंतर शुभमन गिल (३५ धावा) आणि मॅथ्यू वेड (३५ धावा) यांनी दुसऱ्या गडय़ासाठी ७२ धावांची भागिदारी रचत गुजरातचा डाव सावरला. हे दोघेही माघारी परतल्यानंतर पंडय़ा आणि मिलर यांनी डावाची सूत्रे आपल्या हाती घेत गुजरातला १९.३ षटकांत विजय मिळवून दिला. प्रसिध कृष्णाने टाकलेल्या अखेरच्या षटकात मिलरने सलग तीन षटकार खेचले.

त्यापूर्वी, जोस बटलर (५६ चेंडूंत ८९ धावा) आणि कर्णधार संजू सॅमसन (२६ चेंडूंत ४७ धावा) यांच्या आक्रमक खेळींमुळे राजस्थानने २० षटकांत ६ बाद १८८ धावसंख्या उभारली. सलामीवीर यशस्वी जैस्वाल (३) माघारी परतल्यानंतर बटलर आणि सॅमसन यांनी दुसऱ्या गडय़ासाठी निर्णायक अर्धशतकी भागिदारी रचली.

संक्षिप्त धावफलक

राजस्थान रॉयल्स : २० षटकांत ६ बाद १८८ (जोस बटलर ८९, संजू सॅमसन ४७; हार्दिक पंडय़ा १/१४) पराभूत वि. गुजरात टायटन्स : १९.३ षटकांत ३ बाद १९१ (डेव्हिड मिलर नाबाद ६८ , हार्दिक पंडय़ा नाबाद ४०; ट्रेंट बोल्ट १/३८)

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indian premier league cricket gujarat final beat rajasthan seven wickets miller hardik victories ysh

ताज्या बातम्या