पीटीआय, मुंबई : कोलकाता नाइट रायडर्सचा संघ बुधवारी अखेरच्या साखळी लढतीत मोठय़ा फरकाने विजय मिळवून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या बाद फेरीच्या अंधुकशा आशा जिवंत राखू शकेल. दुसरीकडे, लखनऊ सुपर जायंट्सचा संघ गुणतालिकेतील अव्वल चार संघांपैकी स्थान निश्चित करू शकेल.

सात पराभव आणि सहा विजय मिळवणारा कोलकाताचा संघ १२ गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळेच बाद फेरी गाठण्यासाठी दिमाखदार विजय आणि जर-तरची काही समीकरणेसुद्धा अनुकूल व्हावी लागतील. गतवर्षी अंतिम फेरी गाठणाऱ्या दोन वेळा विजेत्या कोलकाताने याआधीच्या दोन सामन्यांत मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबादला हरवून आपले स्थान अबाधित राखले आहे. त्या तुलनेत लखनऊचे बाद फेरीमधील स्थान जवळपास निश्चित मानले जात आहे. १६ गुणांसह लखनऊचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. परंतु बाद फेरीच्या तीन स्थानांसाठी कडवी चुरस असल्यामुळे लखनऊला शेवटच्या सामन्यात विजयाच्या दोन गुणांसह खात्रीने आगेकूच करता येईल.

रहाणेची माघार

मांडीच्या दुखापतीमुळे कोलकाताचा फलंदाज अजिंक्य रहाणेने मंगळवारी उर्वरित ‘आयपीएल’ सामन्यांमधून माघार घेतली आहे. 

‘पॉवरप्ले’च्या षटकांची चिंता

दोन सलग पराभवांद्वारे लखनऊच्या गोलंदाजीच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. ‘पॉवरप्ले’च्या षटकांत दर्जेदार गोलंदाजीपुढे लखनऊचे फलंदाज झगडत असल्याचे प्रत्ययास आले आहे. लखनऊच्या फलंदाजीची प्रमुख धुरा कर्णधार केएल राहुलवर आहे. परंतु दोन अर्धशतकांसह ४६९ धावा काढणारा राहुल गेल्या तीन सामन्यांत अपयशी ठरला आहे. तीन अर्धशतकांसह आतापर्यंत ३६२ धावा काढणारा सलामीवीर क्विंटनटन डीकॉकसुद्धा गेल्या दोन समान्यांत अनुक्रमे ११ आणि ७ धावांवर बाद झाला आहे. दीपक हुडाच्या (४०६ धावा) अर्धशतकामुळे याआधीच्या सामन्यात लखनऊला विजयाच्या आशा दाखवल्या. युवा आयुष बडोनी (१६१ धावा) आणि कृणाल पंडय़ा (१८३ धावा) यांना कामगिरी उंचावण्याची आवश्यकता आहे. जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये गणना केली जाणाऱ्या मार्कस स्टॉइनिसचा कुशलतेने वापर व्हायला हवा. लखनऊच्या गोलंदाजीची मदार आवेश खान (१७ बळी) आणि जेसन होल्डर (१४ बळी) यांच्यावर आहे. मोहसिन खान (१० बळी) गेल्या सामन्यात महागडा ठरला होता. मधल्या षटकांत फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईकडून (११ बळी) प्रतिस्पर्धी फलंदाजांना जखडून ठेवण्याची आशा आहे.

रसेलवर भिस्त

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाताची भिस्त आंद्रे रसेलच्या (३३० धावा आणि १७ बळी) अष्टपैलू कामगिरीवर आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात रसेलच्या कामगिरीला गोलंदाजांची सुरेख साथ लाभली. सातत्यपूर्ण फलंदाजी करणाऱ्या श्रेयसची (३५१ धावा) बॅट गेल्या तीन सामन्यांत थंडावली आहे. नितीश राणा (३१९ धावा) दिमाखात पुलंदाजी करीत आहे. वेंकटेश अय्यरने (१८२ धावा) मात्र निराशा केली आहे. वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने दुखापतीमुळे माघारे घेतल्याने कोलकाताला धक्का बसला आहे. उमेश यादव (१६ बळी) आणि टिम साऊदी (१४ बळी) टिच्चून गोलंदाजी करीत आहेत. सुनील नरिन (९ बळी) आणि वरुण चक्रवर्ती (६ बळी) या द्वयीवर फिरकीची मदार आहे.

  • वेळ : सायं. ७.३० वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, सिलेक्ट १