पीटीआय, मुंबई
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्सचा कुलदीप यादव आणि राजस्थान रॉयल्सचा यजुर्वेद्र चहल या मनगटी फिरकी गोलंदाजांमधील जुगलबंदी पाहायला मिळेल.
सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चहल १७ बळींसह अग्रस्थानी आहे, तर कुलदीप १३ बळींसहदुसऱ्या स्थानी आहे. ‘आयपीएल’ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावरील राजस्थानने सहा सामन्यांत चार विजय मिळवले आहेत, तर सहाव्या क्रमांकावरील दिल्लीने सहापैकी तीन सामने जिंकले आहेत.
दिल्ली कॅपिटल्स संघातील सहा जणांना करोनाची लागण झाल्यामुळे त्यांचा सलग दुसरा सामना पुण्याहून मुंबईत हलवण्यात आला आहे. बुधवारी दिल्लीने पंजाब किंग्जला नऊ गडी राखून नमवत दडपण झुगारले आहे.
बटलरवर भिस्त
सध्या ‘ऑरेंज कॅप’धारक जोस बटलर (६ सामन्यांत ३७५ धावा) आणि ‘पर्पल कॅप’धारक चहल हे दोघेही राजस्थान संघातील आहेत. राजस्थानची आघाडी फळी कोलमडली की, मधल्या फळीतील शिम्रॉन हिटमायर (६ सामन्यांत २२३ धावा) संघाला तारतो. हाणामारीच्या षटकांत टिच्चून गोलंदाजी करणारा वेस्ट इंडिजचा ओबेड मॅककॉयचा सामना करणे आव्हानात्मक असते.
पृथ्वी-वॉर्नरवर मदार
पृथ्वी शॉ (६ सामन्यांत २१७ धावा), डेव्हिड वॉर्नर (४ सामन्यांत १९१ धावा) आणि ऋषभ पंत (६ सामन्यांत १४४ धावा) यांच्यासारख्या आक्रमक फलंदाजांवर दिल्लीची भिस्त आहे. वेगवान माऱ्यापुढे मनदीप सिंग अपयशी ठरत आहे. मात्र सर्फराज खान संधीचे सोने करीत आहे. खलील अहमद (५ सामन्यांत १० बळी), मुस्ताफिझूर अहमद आणि शार्दूल ठाकूर यांच्यावर दिल्लीच्या वेगवान माऱ्याची मदार आहे.
पाँटिंगच्या शब्दांनी दिलासा -अक्षर
पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्याआधी दिल्ली कॅपिटल्सचा संघ करोनासंकटामुळे हादरून गेला होता. परंतु मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगच्या शब्दांनी आमचा आत्मविश्वास उंचावल्यामुळे शानदार विजय मिळवू शकलो, अशा भावना दिल्लीच्या अक्षर पटेलने व्यक्त केल्या. ‘‘आता आपण सामन्याकडे लक्ष केंद्रित करूया आणि त्यासाठी रणनीती आखूया, या पाँटिंग यांच्या भाषणाने आम्हाला बळ दिले,’’ असे अक्षरने सांगितले.
वेळ : सायं. ७.३० वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदूी, सिलेक्ट १ (संबंधित एचडी वाहिन्या)