मुंबई : यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये दिमाखदार कामगिरी करणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्सचे रविवारी राजस्थान रॉयल्सला हरवून बाद फेरीतील स्थान पक्के करण्याचे उद्दिष्ट आहे.
लखनऊने सलग चार विजयांनंतर याआधीच्या लढतीत गुजरातकडून पराभव पत्करला. त्यामुळे केएल राहुलच्या नेतृत्वाखालील हा संघ १६ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. याचप्रमाणे १४ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावरील राजस्थाननेही याआधीच्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सकडून हार पत्करली आहे.
सलामीवीर राहुल (४५९ धावा) व क्विंटन डीकॉक (३५५ धावा) हे लखनऊच्या फलंदाजीचे प्रमुख सामथ्र्य आहे. याशिवाय दीपक हुडानेही ३४७ धावा केल्या आहेत. लखनऊकडे सक्षम गोलंदाजीची फळी नसली तरी आवेश खान (१६ बळी), जेसन होल्डर (१३ बळी) व मोहसिन खान (१० बळी) आपली जबाबदारी चोख बजावत आहेत.
राजस्थानची फलंदाजी इंग्लंडचा यष्टीरक्षक-फलंदाज जोस बटलरवर अवलंबून आहे. १२ सामन्यांत तीन शतके आणि तीन अर्धशतकांसह सर्वाधिक ६२५ धावा त्याच्या खात्यावर आहेत. संजू सॅमसन (३२७ धावा), देवदत्त पडिक्कल (२९५ धावा) व शिमरॉन हेटमायर (२९१ धावा) यांच्या सातत्यपूर्ण फलंदाजीला राजस्थानच्या कामगिरीचे श्रेय जाते. गोलंदाजीतही यजुर्वेद्र चहल (२३ बळी) ‘पर्पल कॅप’च्या शर्यतीत संयुक्त आघाडीवर आहे. प्रसिध कृष्णा (१३ बळी), ट्रेंट बोल्ट (१० बळी) आणि रविचंद्रन अश्विन (९ बळी) अशी तगडी कुमक त्यांच्याकडे आहे.
’ वेळ : सायं. ७.३० वा.
’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदूी, सिलेक्ट १ (एचडी वाहिन्यांसह)