पीटीआय, पुणे
दोन सलग पराभव पत्करणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाचे बुधवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये होणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या लढतीत पारडे जड मानले जात आहे. यासाठी मुंबई इंडियन्सच्या भारतीय गोलंदाजांना कामगिरी उंचावावी लागणार आहे.
‘आयपीएल’मधील पाचवेळा विजेत्या मुंबईने अनुक्रमे दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्सविरुद्धचे सामने गमावले आहेत. दिल्लीने चार गडी राखून मुंबईला हरवले, तर राजस्थानने २३ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे कोलकाताशी होणाऱ्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माला अनेक आघाडय़ांवर सुधारणा करावी लागणार आहे.दुसरीकडे, कोलकाताने आतापर्यंत तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकले आहेत. कोलकाताने चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्जला नमवले आहे, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुकडून हार पत्करली आहे.
• वेळ : सायं. ७.३० वा.
• थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदूी, सिलेक्ट १
इशानवर मदार; सूर्यकुमारची प्रतीक्षा
मुंबईचा वेगवान गोलंदाज बसिल थम्पी आणि फिरकी गोलंदाज मुरुगन अश्विन राजस्थानविरुद्धच्या सामन्यात महागडे ठरले होते. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज डॅनियल सॅम्स, वेस्ट इंडिजचा किरॉन पोलार्ड यांच्यावरही राजस्थानच्या फलंदाजांनी हल्लाबोल केला. टायमल मिल्सने ३५ धावांत ३ बळी मिळवले. या सामन्यात जसप्रीत बुमराने मात्र टिच्चून गोलंदाजी करताना १७ धावांत ३ बळी घेतले. मुंबईची फलंदाजी प्रामुख्याने सलामीवीर इशान किशनवर अवलंबून आहे. त्याने दोन सामन्यांत अनुक्रमे ८१ आणि ५४ धावा केल्या आहेत. मुंबईला मोठी धावसंख्या उभारण्यासाठी इशान आणि रोहितकडून मोठय़ा सलामीची आवश्यकता आहे. मुंबईला सूर्यकुमार यादवच्या समावेशाची प्रतीक्षा आहे. त्याच्या उपलब्धतेबाबत रोहितने स्पष्टीकरण दिलेले नाही. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात एन. टिलक वर्माने ३३ चेंडूंत ६१ धावा काढत लक्ष वेधले. अनमोलप्रीत सिंग, टिम डेव्हिड आणि पोलार्डने कामगिरी उंचावण्याची आवश्यकता आहे.
रसेलवर भिस्त
आंद्रे रसेलची विजयवीराची कामगिरी हे कोलकाता संघाचे वैशिष्टय़ आहे. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात त्याने आठ षटकारांसह नाबाद ७० धावा काढताना सामन्याचे चित्र पालटले. परंतु अजिंक्य रहाणे आणि वेंकटेश अय्यर या त्यांच्या आघाडीवीरांनी निराशा केली. कर्णधार श्रेयस अय्यरकडून (२०*, १३, २६) मोठय़ा खेळीची अपेक्षा आहे. सॅम बिलिंग्ज आणि नितीश राणासुद्धा दर्जाला साजेसा खेळ दाखवू शकलेले नाहीत. कोलकाताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव लयीत असल्याने मुंबईच्या फलंदाजांना त्याच्यापासून सावधगिरी बाळगावी लागणार आहे. पण त्याला टिम साऊदी आणि शिवम मावीकडून उत्तम साथ हवी आहे. वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरिन सामन्याचा निकाल पालटण्यात पटाईत आहेत.