आज मुंबईविरुद्धच्या सामन्यात फलंदाजांच्या कामगिरीवर नजर

पीटीआय, मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या गुणतालिकेत अग्रस्थानी असलेल्या गुजरात टायटन्स संघाचा शुक्रवारी मुंबई इंडियन्सशी सामना रंगणार आहे. ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात विजयासह गुजरातला बाद फेरीतील आपले स्थान पक्के करण्याची संधी मिळेल. यंदा ‘आयपीएल’मध्ये पदार्पण करणाऱ्या गुजरातच्या संघाला आतापर्यंत १० पैकी आठ सामने जिंकण्यात यश आले आहे. परंतु गेल्या सामन्यात पंजाब किंग्जकडून पराभव पत्करावा लागला. या सामन्यात त्यांच्या फलंदाजांनी निराशा केली. त्यामुळे ते मुंबईविरुद्ध कशी कामगिरी करतात, याकडे सर्वाची नजर असेल. दुसरीकडे, बाद फेरीच्या शर्यतीतून बाहेर झालेल्या मुंबईच्या संघाने गेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर मात केली. हा त्यांचा यंदाच्या हंगामातील पहिला विजय ठरला. त्यामुळे मुंबईच्या खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला असून सलग दुसऱ्या विजयासाठी ते प्रयत्नशील असतील.

आघाडीच्या फळीची चिंता

गुजरातकडून कर्णधार हार्दिक पंडय़ाने (नऊ सामन्यांत ३०९ धावा) फलंदाजीत अप्रतिम कामगिरी केली आहे. तसेच डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया आणि रशीद खान हे विजयवीराची भूमिका चोख बजावत आहेत. मात्र, गुजरातला आघाडीच्या फळीची चिंता आहे. शुभमन गिल, वृद्धिमान साहा आणि साई सुदर्शन या अव्वल तीन फलंदाजांनी काही चांगल्या खेळी केल्या आहेत. परंतु त्यांना कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. गुजरातच्या गोलंदाजीची भिस्त मोहम्मद शमी, लॉकी फग्र्युसन आणि अल्झारी जोसेफ या वेगवान त्रिकुटासह लेग-स्पिनर रशीदवर असेल.

सूर्यकुमार, तिलककडून अपेक्षा

मुंबईच्या संघाला यंदा अपेक्षित कामगिरी करता आलेली नसली, तरी अनुभवी सूर्यकुमार यादव (सात सामन्यांत २९० धावा) आणि युवा तिलक वर्मा (नऊ सामन्यांत ३०७ धावा) यांनी सातत्यपूर्ण खेळासह सर्वाना प्रभावित केले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून पुन्हा चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. कर्णधार रोहित शर्मा, इशान किशन आणि किरॉन पोलार्ड यांनी खेळ उंचावत त्यांना साथ देणे गरजेचे आहे. गोलंदाजीत मुंबईचा संघ जसप्रीत बुमरा आणि रायली मेरेडिच यांच्यावर अवलंबून आहे. 

मिल्सच्या जागी स्टुब्जची निवड

मुंबई इंडियन्सचा डावखुरा वेगवान गोलंदाज टायमल मिल्स पायाच्या दुखापतीमुळे ‘आयपीएल’च्या उर्वरित हंगामाला मुकणार आहे. त्याच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा २१ वर्षीय यष्टिरक्षक-फलंदाज ट्रिस्टन स्टुब्जची मुंबईच्या संघात निवड करण्यात आली आहे. मिल्सला यंदाच्या हंगामातील पाच सामन्यांत केवळ सहा गडी बाद करता आले आणि त्याने ११.१७च्या धावगतीने धावा दिल्या. त्यामुळे त्याला संघातील स्थानही गमवावे लागले होते. आता स्टुब्जला ‘आयपीएल’मध्ये पदार्पणाची संधी मिळू शकेल. त्याने आतापर्यंत १७ स्थानिक ट्वेन्टी-२० सामन्यांत तीन अर्धशतकांसह ५०६ धावा केल्या आहेत.

  •   वेळ : सायं. ७.३० वा.
  •   थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, सिलेक्ट १ (संबंधित एचडी वाहिन्या)