पीटीआय, अहमदाबाद : दोन प्रतिभावान कर्णधार, दोन तुल्यबळ संघ, एका संघाचे पदार्पणातच जेतेपदाचे लक्ष्य, तर दुसऱ्या संघाचे १४ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न. सामना एक, पटकथा अनेक. रविवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या १५व्या हंगामाच्या अंतिम लढतीत गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमनेसामने येणार असून दोन्ही संघांचा इतिहास घडवण्याचा मानस आहे.

अष्टपैलू हार्दिक पंडय़ाच्या नेतृत्वाखालील गुजरातला हंगामाआधी झालेल्या ‘आयपीएल’ खेळाडू लिलाव प्रक्रियेअंती अनेक क्रिकेट समीक्षक स्पर्धेतील सर्वात दुबळा संघ म्हणून संबोधत होते. हार्दिक, रशीद खान, शुभमन गिल, मोहम्मद शमी आणि लॉकी फग्र्युसन यांसारख्या काही अनुभवी खेळाडूंचा अपवाद वगळता इतरांकडून फारशा अपेक्षा नव्हत्या. डेव्हिड मिलरसारख्या खेळाडूमध्ये आता विजयवीराची भूमिका बजावण्याची क्षमता उरलेली नाही. राहुल तेवतियासारख्या खेळाडूवर अवलंबून राहणे योग्य नसल्याचे म्हटले जात होते. मात्र, या सर्व खेळाडूंनी वेळोवेळी आपली कामगिरी उंचावल्याने गुजरात हा यंदा सर्वाधिक सामने जिंकणारा संघ म्हणून पुढे आला. त्यांनी १४ पैकी १० साखळी सामने जिंकण्याची किमया साधली. गुणतालिकेत अग्रस्थान पटकावल्यानंतर त्यांनी ‘क्वॉलिफायर-१’मध्ये राजस्थानला शह देत अंतिम फेरी गाठली. आता त्यांचे पहिल्याच हंगामात जेतेपद मिळवण्याचे लक्ष्य असेल.

‘आयपीएल’च्या इतिहासात आतापर्यंत केवळ एकाच संघाला पदार्पणात जेतेपदाला गवसणी घालण्यात यश आले आहे. ऑस्ट्रेलियाचा दिवंगत फिरकीपटू शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थानने २००८मध्ये ‘आयपीएल’च्या पहिल्या हंगामात ही कामगिरी केली होती. त्यानंतर राजस्थानला अंतिम फेरीचा टप्पाही गाठता आला नाही. यंदा मात्र संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थानच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांनी १४ पैकी ९ साखळी सामने जिंकले. त्यानंतर त्यांना ‘क्वालिफायर-१’च्या सामन्यात गुजरातने पराभूत केले. परंतु त्यानंतर त्यांना ‘क्वॉलिफायर-२’च्या सामन्यात बंगळूरुवर मात करण्यात यश आले. आता अंतिम सामन्यात त्यांचा १४ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न असेल.

सर्वाधिक धावा (ऑरेंज कॅप)

१. जोस बटलर   ८२५

२. केएल राहुल   ६१६

३. क्विंटन डीकॉक    ५०८

४. फॅफ डय़ूप्लेसिस   ४६८

५. शिखर धवन ४६०

सर्वाधिक बळी (पर्पल कॅप)

१. वानिंदू हसरंगा    २६

२. यजुर्वेद्र चहल २६

३. कॅगिसो रबाडा     २३

४. उमरान मलिक    २२

५. कुलदीप यादव    २१

२-० उभय संघांमध्ये यंदाच्या हंगामामध्ये झालेल्या दोन्ही सामन्यांत गुजरातने वर्चस्व गाजवले.

१-० राजस्थानने २००८च्या पहिल्या ‘आयपीएल’ हंगामात विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर यंदा प्रथमच अंतिम फेरी गाठण्यात हा संघ यशस्वी ठरला आहे.

खेळपट्टी

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवरील खेळपट्टय़ा तयार करण्यासाठी लाल मातीचा वापर केला जातो. या खेळपट्टय़ांवर फिरकीपटूंना साहाय्य मिळण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे मधल्या षटकांमध्ये धावांची गती कमी होणे अपेक्षित आहे. मात्र, फलंदाजांना डावाच्या सुरुवातीला आक्रमक शैलीत खेळ करता येऊ शकेल. या मैदानावरील प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांची सरासरी धावसंख्या ही १६५ इतकी आहे. 

‘यंदाचा हंगाम वॉर्नला समर्पित’

यंदाच्या ‘आयपीएल’ हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी राजस्थानचा माजी कर्णधार शेन वॉर्नचे निधन (४ मार्च) झाले. वॉर्नला ‘पहिला रॉयल’ म्हणून संबोधले जाते. त्यामुळे अंतिम सामन्यात विजय मिळवून वॉर्नला आदरांजली वाहण्याचा राजस्थानच्या संघाचा प्रयत्न आहे. ‘‘यंदाचा हंगाम आम्ही वॉर्नला समर्पित केला आहे. आता आम्ही जेतेपदापासून केवळ एक पाऊल दूर आहोत. आम्हाला त्याच्यासाठी काही तरी खास करायचे आहे,’’ असे  राजस्थानचा कर्णधार सॅमसन म्हणाला.

गुजरात टायटन्स

हार्दिक, मिलरवर नजर

यंदाच्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी गुजरातची फलंदाजी संपूर्ण स्पर्धेत सर्वात कमकुवत मानली जात होती. मात्र, कर्णधार हार्दिक पंडय़ा (१४ सामन्यांत ४५३ धावा) आणि डावखुरा डेव्हिड मिलर (१५ सामन्यांत ४४९) या अनुभवी जोडीने सातत्यपूर्ण कामगिरी करत गुजरातच्या फलंदाजीला बळकटी दिली आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात त्यांच्या कामगिरीवर सर्वाची नजर असेल. शुभमन गिल (१५ सामन्यांत ४३८) आणि वृद्धिमान साहा (१० सामन्यांत ३१२) या सलामीवीरांनी गुजरातला बहुतांश सामन्यांमध्ये उत्तम सुरुवात करून दिली आहे. तसेच अखेरच्या षटकांमध्ये राहुल तेवतिया आणि रशीद खान यांच्यात फटकेबाजीची क्षमता आहे.

शमी, रशीदकडून अपेक्षा

गुजरातच्या यशात गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मोहम्मद शमी (१५ सामन्यांत १९ बळी) आणि तारांकित लेग-स्पिनर रशीद खान (१५ सामन्यांत १८ बळी) यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात यश आले आहे. तसेच सातत्याने ताशी १५० किमीच्या वेगाने गोलंदाजी करणाऱ्या लॉकी फग्र्युसननेही (१२ सामन्यांत १२ बळी) छाप पाडली आहे. मात्र, अल्झारी जोसेफ, यश दयाल, आर. साई किशोर यांसारख्या गोलंदाजांनी कामगिरी उंचावणे गरजेचे आहे.

संघ : हार्दिक पंडय़ा (कर्णधार), अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, गुरकीरत सिंग, बी. साई सुदर्शन, शुभमन गिल, राहुल तेवतिया, विजय शंकर, मॅथ्यू वेड, रहमानउल्ला गुरबाज, वृद्धिमान साहा, अल्झारी जोसेफ, दर्शन नलकांडे, मोहम्मद शमी, लॉकी फग्र्युसन, नूर अहमद, प्रदीप सांगवान, रशिद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, वरुण आरोन, यश दयाल.

राजस्थान रॉयल्स

बटलरला विक्रमाची संधी

राजस्थानचा सलामीवीर जोस बटलरने यंदाच्या हंगामात १६ सामन्यांत चार शतकांसह तब्बल ८२४ धावा फटकावल्या आहेत. त्यामुळे ‘आयपीएल’च्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर आहे. या यादीत अग्रस्थानावर असलेल्या विराट कोहलीला (२०१६च्या हंगामात

९७३ धावा) मागे टाकण्याची बटलरला संधी मिळेल. त्याला फलंदाजीत शिम्रॉन हेटमायर (१४ सामन्यांत ३०३) आणि यशस्वी जैस्वाल (९ सामन्यांत २३६) यांची साथ लाभते आहे. सॅमसनने कर्णधार म्हणून प्रभावित केले असले, तरी फलंदाज म्हणून त्याच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आहे.

चहलसह पंचकावर भिस्त

राजस्थानच्या गोलंदाजांनी यंदाच्या हंगामात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यंदा सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांमध्ये राजस्थानचा लेग-स्पिनर यजुर्वेद्र चहल (१६ सामन्यांत २६ बळी) संयुक्तरीत्या अग्रस्थानावर आहे. अनुभवी ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनने १६ सामन्यांत १२ बळी मिळवले आहेत. तसेच प्रसिध कृष्णा (१६ सामन्यांत १८ बळी), ट्रेंट बोल्ट (१५ सामन्यांत १५ बळी) आणि ओबेड मकॉय (६ सामन्यांत ११ बळी) या वेगवान त्रिकुटाच्या कामगिरीचा आलेख सामन्यागणिक उंचावल्याचे पाहायला मिळाले आहे.

संघ : संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, शिम्रॉन हेटमायर, देवदत्त पडिक्कल, प्रसिध कृष्णा, यजुर्वेद्र चहल, रियान पराग, केसी करिअप्पा, नवदीप सैनी, ओबेद सिंग, ओबेड मकॉय, कुलदीप सेन, करुण नायर, ध्रुव जुरेल, तेजस बरोका, कुलदीप यादव, शुभम गढवाल, जेम्स नीशम, रॅसी व्हॅन डर डय़ूसेन, डॅरेल मिचेल, कॉर्बिन बॉश.

  •   स्थळ : नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद  ल्ल  वेळ : रात्री ८ वा.  ल्ल   थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी, सिलेक्ट १