इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : राजस्थान दुसऱ्या प्रयत्नात अंतिम फेरीत; बटलरचे नाबाद शतक; बंगळूरुवर शानदार विजय

राजस्थानने नाणेफेक जिंकून बंगळूरुला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. बंगळूरुचा सलामीवीर विराट कोहली (७) लवकर बाद झाला.

वृत्तसंस्था, अहमदाबाद : सलामीवीर जोस बटलरने (६० चेंडूंत नाबाद १०६ धावा) साकारलेल्या शतकाच्या बळावर राजस्थान रॉयल्सनी शुक्रवारी ‘क्वालिफायर-२’च्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुला सात गडी आणि ११ चेंडू राखून पराभूत करत इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बंगळूरुचे १५८ धावांचे लक्ष्य राजस्थानने १८.१ षटकांत गाठले. राजस्थानला ‘क्वालिफायर-१’मध्ये गुजरात टायटन्सनी पराभूत केले होते. मात्र, दुसऱ्या प्रयत्नात राजस्थानने अंतिम फेरी गाठली.

राजस्थानने नाणेफेक जिंकून बंगळूरुला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. बंगळूरुचा सलामीवीर विराट कोहली (७) लवकर बाद झाला. मात्र, गेल्या सामन्यातील शतकवीर रजत पाटीदार (४२ चेंडूंत ५८) व कर्णधार फॅफ डय़ूप्लेसिस (२७ चेंडूंत २५) यांनी दुसऱ्या गडय़ासाठी ७० धावांची भागिदारी रचली. परंतु, हे दोघे माघारी परतल्यानंतर ग्लेन मॅक्सवेल (२४) वगळता इतर फलंदाजांनी निराशा केली. त्यामुळे बंगळूरुला २० षटकांत ८ बाद १५७ ही धावसंख्या उभारता आली. राजस्थानच्या प्रसिध कृष्णा (३/२२) व मकॉय (३/२३) यांनी प्रभावी मारा केला.

प्रत्युत्तरात राजस्थानचे सलामीवीर बटलर आणि यशस्वी जैस्वाल (१३ चेंडूंत २१) यांनी आक्रमक शैलीत फलंदाजी केली. यशस्वी बाद झाल्यावर बटलरने डावाची सूत्रे हाती घेतली. त्याने १० चौकार आणि सहा षटकार मारत राजस्थानला विजय मिळवून दिला. त्याला संजू सॅमसनची (२१ चेंडूंत २३) साथ लाभली. ४ बटलरने या सामन्यात हंगामातील चौथे शतक झळकावले. त्यामुळे त्याने एका ‘आयपीएल’ हंगामात सर्वाधिक शतकांच्या विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली.

संक्षिप्त धावफलक

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु : २० षटकांत ८ बाद १५७ (रजत पाटीदार ५८; प्रसिध कृष्णा ३/२२, ओबेड मकॉय ३/२३) पराभूत वि. राजस्थान रॉयल्स : १८.१ षटकांत ३ बाद (जोस बटलर नाबाद १०६, संजू सॅमसन २३; जोश हेझलवूड २/२३)  

कार्तिकला तंबी

लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात ‘आयपीएल’ आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकला तंबी देण्यात आली आहे. कार्तिकने ‘आयपीएल’ आचारसंहितेमधील प्रथम स्तरावरील कलम २.३चे उल्लंघन केले आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indian premier league cricket rajasthan reach second round final butler unbeaten century great victory over bangalore ysh

Next Story
मोहम्मद सिराजच्या नावे झाली ‘या’ लाजीरवाण्या विक्रमाची नोंद
फोटो गॅलरी