इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : राजस्थानचा ‘यशस्वी’ पाठलाग!

उदयोन्मुख सलामीवीर यशस्वी जैस्वालने दिमाखदार अर्धशतकी खेळी साकारल्यामुळे राजस्थान रॉयल्सने शनिवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये पंजाब किंग्जवर सहा गडी राखून विजय मिळवला.

पंजाबवर सहा गडी राखून विजय

वृत्तसंस्था, मुंबई : उदयोन्मुख सलामीवीर यशस्वी जैस्वालने दिमाखदार अर्धशतकी खेळी साकारल्यामुळे राजस्थान रॉयल्सने शनिवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये पंजाब किंग्जवर सहा गडी राखून विजय मिळवला. या विजयासह राजस्थान रॉयल्सच्या बाद फेरीच्या आशा जिवंत राहिल्या आहेत.

करुण नायरच्या जागी संघात समावेश करण्यात आलेल्या यशस्वीने ४१ चेंडूंत ९ चौकार आणि २ षटकारांनिशी ६८ धावांची खेळी उभारल्यामुळे १९० धावांचे लक्ष्य राजस्थानला साध्य करता आले. यशस्वी पाठलाग प्रथमच यशस्वी ठरलेल्या राजस्थानच्या खात्यावर ११ सामन्यांत १४ गुण जमा असून, ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे ‘आयपीएल’च्या यंदाच्या हंगामातून मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात आले आहे. राजस्थानकडून जोस बटलर (३०) आणि यशस्वीने ४६ धावांची सलामी दिली. याशिवाय कर्णधार संजू सॅमसन (२३), देवदत्त पडिक्कल (३१) आणि शिमरॉन हेटमायर (नाबाद ३१) यांचे योगदान महत्त्वाचे ठरले.

त्याआाधी, नाणेफेक जिंकून पंजाबने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सूर गवसलेल्या जॉनी बेअरस्टोने शानदार अर्धशतकाच्या बळावर पंजाबला ५ बाद १८९ धावसंख्या उभारून दिली. बेअरस्टोने ४० चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकारासह ५६ धावा केल्या. याशिवाय जितेश शाह (१८ चेंडूंत नाबाद ३८ धावा) आणि लियाम लििव्हगस्टोन (१४ चेंडूंत २२ धावा) यांनी पंजाबच्या धावसंख्येत महत्त्वाचे योगदान दिले. राजस्थानकडून चहलने २८ धावांत ३ बळी मिळवले.

संक्षिप्त धावफलक

पंजाब किंग्ज : २० षटकांत ५ बाद १८९ (जॉनी बेअरस्टो ५६, जितेश शर्मा नाबाद ३८; यजुर्वेद्र चहल ३/२८) पराभूत वि. राजस्थान रॉयल्स : १९.४ षटकांत ४ बाद १९० (यशस्वी जैस्वाल ६८, शिमरॉन हेटमायर नाबाद ३१; अर्शदीप सिंग २/२९)

सामनावीर : यशस्वी जैस्वाल

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indian premier league cricket rajasthan successful chase punjab won six wickets ysh

Next Story
दिल्लीपुढे सलामीचा पेच; आज चेन्नईशी सामना
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी