आज अखेरच्या साखळी लढतीत मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय आवश्यक

पीटीआय, मुंबई : इंडियन्स प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटची बाद फेरी गाठण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सला शनिवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय आवश्यक आहे. त्यामुळे ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघासाठी हा जणू उपांत्यपूर्व सामनाच आहे. दिल्लीने १३ सामन्यांत ७ विजयांसह १४ गुण मिळवले असले तरी  ०.२५५ निव्वळ धावगतीमुळे मुंबईविरुद्धचा सामना जिंकल्यास ते बाद फेरीसाठी पात्र ठरू शकतात. कारण सध्या चौथ्या क्रमांकावरील रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुच्या खात्यावर १६ गुण असले तरी -०.२५३ निव्वळ धावगती ही त्यांच्यासाठी अडचणीची ठरू शकेल. दुसरीकडे, लिलावातील चुकीच्या रणनीतीमुळे पाच वेळा विजेता मुंबईचा संघ यंदा प्रथमच गुणतालिकेत तळाच्या स्थानावर फेकला गेला आहे. आतापर्यंतच्या १३ सामन्यांत १० पराभव पत्करणाऱ्या मुंबईला फक्त तीन विजय मिळवता आले आहेत, परंतु किमान हंगामाचा शेवट विजयानिशी करण्यासाठी ते उत्सुक आहेत.

मिचेलवर मदार

दिल्लीकडे एकापेक्षा एक सरस फलंदाजांचा भरणा आहे. डेव्हिड वॉर्नर (४२७ धावा), मिचेल मार्श (२५१ धावा), रोव्हमन पॉवेल (२०७ धावा) या परदेशी फलंदाजांमुळे हा संघ बळकट आहे. स्पर्धेच्या उत्तरार्धात सूर गवसलेल्या मार्शने नोंदवलेल्या अर्धशतकांमुळे दिल्लीचे आव्हान जिवंत आहे. पंतला (३०१ धावा) उत्तम सुरुवातीचे मोठय़ा खेळीत रूपांतरण करण्यात अपयश आले आहे. अक्षर पटेल आणि ललित यादव हाणामारीच्या षटकांत फलंदाजी करण्यात वाकबदार आहेत. दिल्लीच्या वेगवान गोलंदाजीच्या माऱ्याची धुरा खलिल अहमद (१६ बळी) आणि शार्दूल ठाकूर (१३ बळी) यांच्या खांद्याावर आहे. तर कुलदीप यादव (२० बळी), अक्षर (६ बळी) आणि ललित (४ बळी) यांच्यावर फिरकीची मदार आहे. मुस्ताफिझूर रेहमानच्या खात्यावरही ८ बळी असले तरी सांघिक समतोल साधताना प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांना त्याला संघाबाहेर ठेवावे लागत आहे. या महत्त्वाच्या सामन्यात सर्फराज खानला सलामीवीर म्हणून आणखी एक संधी मिळू शकेल. पृथ्वी शॉ आजारी पडल्यामुळे कोना भरतला मिळालेल्या संधीचे सोने करता आले नाही. सर्फराजने मात्र पंजाब किंग्जविरुद्धच्या याआधीच्या सामन्यात ३२ धावा काढल्या होत्या.

टिलककडे लक्ष

गेल्या दोन हंगामांमधील २७ सामन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला हंगामातील अखेरच्या सामन्यात तरी संधी मिळते का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. आतापर्यंतच्या १३ सामन्यांत २२ खेळाडूंना अजमावले असले तरी शेवटच्या सामन्यात नव्या चेहऱ्यांना संघात स्थान दिले जाणार असल्याचे कर्णधार रोहित शर्माने स्पष्ट केले आहे. सर्वाधिक ३७६ धावा काढणाऱ्या टिलक वर्मा आणि टिम डेव्हिड (१५२ धावा) यांच्यावर मुंबईच्या फलंदाजीची मदार आहे. सलामीवीर इशान किशन, कर्णधार रोहित शर्मा, किरॉन पोलार्ड यांना धावांचे सातत्य राखता आले नाही. मुंबईच्या गोलंदाजीची जबाबदारी जसप्रित बुमरा (१२ बळी) आणि डॅनियल सॅम्स (१२ बळी) यांच्यावर आहे.

चांगले क्रिकेट खेळण्यात अपयशी -जयवर्धने

यंदाच्या हंगामात आमचे संघ चांगले क्रिकेट खेळण्यात अपयशी ठरला, असे मुंबईचा प्रशिक्षक महेला जयवर्धनेने सांगितले. ‘‘मुंबईच्या संघात दर्जेदार खेळाडूंचा समावेश होता, परंतु प्रामणिकपणे सांगायचे तर आम्ही उत्तम क्रिकेट खेळलो नाही. महत्त्वाच्या क्षणी सामन्यावरील नियंत्रण गमावल्यामुळे चार-पाच विजय निसटले. त्यामुळे मी निराश झालो आहे,’’ असे जयवर्धने म्हणाला.

  • वेळ : सायं. ७.३० वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, सिलेक्ट १ (एचडी वाहिन्यांसह)