पीटीआय, अहमदाबाद : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटचे जेतेपद पटकावण्याची ही माझी एकूण पाचवी वेळ होती. मात्र, यंदा मी पहिल्यांदाच नेतृत्वाची धुरा सांभाळत होतो. त्यामुळे यंदाचे जेतेपद माझ्यासाठी सर्वात खास आहे, असे मनोगत रविवारी झालेल्या अंतिम सामन्यानंतर गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंडय़ाने व्यक्त केले.

अहमदाबाद येथील घरच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सवर सात गडी राखून मात करत गुजरातने पदार्पणाच्या हंगामातच जेतेपद पटकावण्याची किमया साधली. हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी गुजरातला या स्पर्धेतील सर्वात दुबळा संघ मानले जात होते. मात्र, हार्दिकच्या सक्षम नेतृत्वाखाली या संघाने ऐतिहासिक कामगिरी केली. पदार्पणात ‘आयपीएल’ जिंकणारा गुजरात हा राजस्थाननंतर दुसराच संघ ठरला. आपल्या संघाच्या या कामगिरीचा हार्दिकला अभिमान होता. हार्दिकने यापूर्वी मुंबई इंडियन्सकडून खेळताना चार (२०१५, २०१७, २०१९, २०२०) वेळा ‘आयपीएल’चे जेतेपद मिळवले होते. मात्र, यंदाच्या जेतेपदाला त्याच्या मनात वेगळे स्थान आहे.

‘‘यंदा मी पहिल्यांदाच कर्णधार म्हणून ही स्पर्धा जिंकली. त्यामुळे हे जेतेपद माझ्यासाठी अधिक खास आहे. परंतु आधीच्या चार जेतेपदांनाही महत्त्व आहेच. ‘आयपीएल’ जिंकणे हे कायमच खूप खास असते. मला पाच अंतिम सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली आणि पाचही वेळा माझ्या संघाने जेतेपदाला गवसणी घातली. त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो,’’ असे हार्दिक म्हणाला. ‘‘आमचा संघ नवीन होता, आम्ही पहिल्यांदाच या स्पर्धेत खेळत होतो आणि पहिल्याच प्रयत्नात आम्ही जेतेपद पटकावले. त्यामुळे आमच्या संघाने केलेली कामगिरी कायम सर्वाना लक्षात राहील,’’ असेही हार्दिकने सांगितले.

मैदान कर्मचाऱ्यांना रोख बक्षीस

मुंबई : ‘आयपीएल’चा यंदाचा हंगाम यशस्वीरीत्या संपन्न होण्यात खेळपट्टी देखरेखकार (क्युरेटर) आणि मैदान कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे त्यांना १.२५ कोटी रूपयांचे रोख बक्षीस देणार असल्याची घोषणा ‘बीसीसीआय’ने सोमवारी केली. ब्रेबॉर्न, वानखेडे, डॉ. डी. वाय. पाटील आणि ‘एमसीए’ पुणे स्टेडियमला प्रत्येकी २५ लाख, तर ईडन आणि नरेंद्र मोदी स्टेडियमला १२.५ लाखांचे रोख बक्षीस देण्यात येईल.

इतरांसमोर आदर्श ठेवण्याचा प्रयत्न!

यंदा हार्दिकने कर्णधार म्हणून सर्वाना प्रभावित केले. तसेच त्याने १५ सामन्यांत ४८७ धावा करतानाच आठ बळीही मिळवत गुजरातच्या जेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावली. ‘‘मला अतिरिक्त जबाबदारी आवडते. स्वत: चांगली कामगिरी करून इतरांसमोर आदर्श ठेवण्याचा माझा कायम प्रयत्न असतो. माझ्या संघाने ठरावीक पद्धतीने खेळावे असे वाटत असल्यास मी स्वत: आधी त्याप्रमाणे खेळ केला पाहिजे. मी इतर खेळाडूंना मार्ग दाखवला पाहिजे. यंदा तेच करण्याचा माझा प्रयत्न होता,’’ असे हार्दिकने नमूद केले.

Story img Loader