आजच्या सामन्यात धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईचे आव्हान

पीटीआय, मुंबई : बाद फेरीसह गुणतालिकेतील अव्वल दोन स्थानांसाठी उत्सुक राजस्थान रॉयल्स संघापुढे शुक्रवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचे आव्हान असेल. ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात चेन्नईचा पराभव केल्यास राजस्थानचे १८ गुण होतील आणि त्यांचा बाद फेरीतील प्रवेश सुनिश्चित होईल. तसेच ते लखनऊ सुपर जायंट्सला मागे टाकत गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावतील. सध्या राजस्थानची (०.३०४) निव्वळ धावगती लखनऊपेक्षा (०.२५१) चांगली आहे. मात्र गुणतालिकेत बढती मिळवण्यासाठी राजस्थानने हा सामना जिंकणे अनिवार्य आहे.

बटलरच्या कामगिरीवर लक्ष

यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये राजस्थानचा सलामीवीर जोस बटलर (१३ सामन्यांत ६२७ धावा) अग्रस्थानावर आहे. परंतु गेल्या चार सामन्यांत त्याला अनुक्रमे २२, ३०, ७ आणि २ धावाच करता आल्या आहेत. त्यामुळे तो कामगिरी पुन्हा उंचावतो का, याकडे चाहत्यांचे लक्ष असेल. फलंदाजीत त्याला यशस्वी जैस्वाल, कर्णधार संजू सॅमसन आणि देवदत्त पडिक्कल यांची साथ लाभेल. तसेच शिम्रॉन हेटमायरच्या पुनरागमनामुळे राजस्थानच्या मधल्या फळीला बळकटी मिळाली आहे. त्यांच्या गोलंदाजीची भिस्त यजुर्वेद्र चहल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट आणि प्रसिध कृष्णा या चौकडीवर आहे.

धोनीचा अखेरचा सामना?

चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा हा ‘आयपीएल’ कारकीर्दीतील अखेरचा सामना ठरू शकेल. धोनीने पुढील हंगामात खेळणार की नाही, हे अजून स्पष्ट केलेले नाही. तो या सामन्यात दमदार कामगिरी करण्यासाठी उत्सुक असेल. चेन्नईला त्याच्यासह ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉन्वे, अंबाती रायुडू आणि रॉबिन उथप्पा यांच्याकडून फलंदाजीत चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. चेन्नईच्या गोलंदाजीची मदार डावखुरा मुकेश चौधरी, सिमरजीत सिंग आणि श्रीलंकन मथीश पथिराना या युवा वेगवान गोलंदाजांवर आहे. फिरकीपटू महीश थीकसाना आणि मोईन अलीचे योगदानही महत्त्वाचे असेल.

  • वेळ : सायं. ७.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी, सिलेक्ट १ (संबंधित एचडी वाहिन्यांवर)