मिचेल मार्शसह चार जणांना करोनाची बाधा; पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्याबाबत साशंकता
पीटीआय, मुंबई
दिल्ली कॅपिटल्सच्या संघातील करोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळत असून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटचा सध्या सुरू असलेला हंगाम अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दिल्लीचा ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मिचेल मार्शसह डॉक्टर अभिजीत साळवी आणि अन्य एका साहाय्यकाच्या करोना चाचणीचा अहवाल सोमवारी सकारात्मक आला. तसेच दिल्ली संघाचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांना गेल्या शुक्रवारी करोनाची बाधा झाली होती. त्यामुळे दिल्ली संघातील एकूण करोनाबाधितांची संख्या चार झाली असून दिल्ली आणि पंजाब किंग्ज यांच्यात बुधवारी होणाऱ्या सामन्यावरही प्रश्नचिन्ह आहेत.
‘‘मिचेल मार्शच्या पहिल्या आरटी-पीसीआर करोना चाचणीचा अहवाल नकारात्मक आला. त्यानंतर दुसऱ्यांदा त्याची आरटी-पीसीआर चाचणी झाली आणि त्याचा अहवाल मात्र सकारात्मक आला. अन्य खेळाडूंचा अहवाल नकारात्मक आहे,’’ असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
मार्शला करोनाची सौम्य लक्षणे होती. त्यामुळे सुरुवातीला त्याची प्रतिजन चाचणी करण्यात आली आणि यात त्याचा अहवाल सकारात्मक आला. मात्र, त्यानंतर सर्व खेळाडूंसह त्याचीही आरटी-पीसीआर चाचणी झाली. त्याचा अहवाल नकारात्मक आल्याने दिल्लीला दिलासा मिळाला होता. परंतु त्यानंतर मार्शच्या दुसऱ्या आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल पुन्हा सकारात्मक आल्याने दिल्ली संघाचे व्यवस्थापन आणि ‘बीसीसीआय’ची चिंता वाढली आहे.
मार्शला यंदाच्या ‘आयपीएल’पूर्वी दुखापत झाली होती. तो फिजिओ फरहार्ट आणि संघाचे डॉक्टर साळवी यांच्या देखरेखीतच उपचार घेत होता. फरहार्ट यांच्या संपर्कात आल्यानेच मार्श आणि साळवी यांना करोनाची बाधा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच संघाच्या जैव-सुरक्षा परिघात करोनाचा शिरकाव झाल्यामुळे दिल्लीच्या संघाला सोमवारी ठरल्याप्रमाणे पुणे येथे जाता आले नाही.
सर्व खेळाडूंना आपापल्या खोलीत परतण्यास सांगण्यात आले. तसेच दिल्लीच्या सर्व सदस्यांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. त्यानंतर मार्शसह अन्य काही सदस्यांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांना विलगीकरणात राहावे लागेल.
मार्श रुग्णालयात दाखल
करोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्यानंतर मार्शला रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी दिल्ली कॅपिटल्सने ‘ट्वीट’ करून माहिती दिली. त्याला पुढील किमान १० दिवस मैदानाबाहेर राहावे लागण्याची शक्यता आहे. मार्शला यंदा दुखापतीमुळे सुरुवातीच्या चार सामन्यांना मुकावे लागले होते. मात्र, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्धच्या गेल्या सामन्यात त्याने दिल्लीकडून पदार्पण केले. या सामन्यात त्याला २४ चेंडूंत केवळ १४ धावाच करता आल्या. आता करोनाची बाधा झाल्यामुळे त्याला आणखी काही सामन्यांना मुकावे लागणार आहे.