पीटीआय, पुणे : विजयपथावर परतलेल्या कोलकाता नाइट रायडर्सपुढे शनिवारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) सध्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या लखनऊ सुपर जायंट्सचे आव्हान समोर असेल. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर होणारा हा सामना जिंकून बाद फेरीसाठी आपली दावेदारी जवळपास पक्की करण्याचा प्रयत्न लखनऊचा असेल. लखनऊने १० सामन्यांत ७ विजय आणि ३ पराभवांसह १४ गुण कमावले आहेत, तर कोलकाताने १० सामन्यांत ४ विजय आणि ६ पराभवांसह ८ गुण मिळवले आहेत.

कर्णधार केएल राहुल हा लखनऊच्या फलंदाजीचा मुख्य आधारस्तंभ आहे. त्याने आतापर्यंत ४५१ धावा केल्या आहेत. मात्र, त्याला इतर फलंदाजांची साथ मिळणे गरजेचे आहे. गोलंदाजीत मोहसीन खानला दुष्मंथा चमीरा, रवी बिश्नोई आणि कृणाल पंडय़ा यांची चांगली साथ मिळत आहे. दुसरीकडे, कोलकाताच्या फलंदाजीत सलामीवीरांकडून डावाची चांगली सुरुवात होणे गरजेचे आहे. कर्णधार श्रेयस अय्यरने १० सामन्यांत ३२४ धावा केल्या असूनही आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा यांनी चमक दाखवणे गरजेचे आहे. गोलंदाजीत उमेश यादव, सुनील नरेन यांना इतरांनी साथ देणे आवश्यक आहे. 

  • वेळ : सायं. ७.३० वा.
  • थेट प्रक्षेपण :  स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी, सिलेक्ट १ (संबंधित एचडी वाहिन्यांवर)