आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील १९ वा सामना अनेक कारणांनी विशेष ठरला. या हंगामाच्या सुरुवातीपासून पंचांच्या खराब कामगिरीची चर्चा होत आहे. शनिवारी झालेल्या आरसीबी आणि मुंबई इंडियन्सच्या सामन्यात विराट कोहलीला चुकीच्या पद्धतीने बाद केल्यामुळे पंचांच्या कामावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान आजच्या केकेआर आणि दिल्ली कॅपिटल्स या सामन्यातही पंचांनी तीन वेळा चुकीचा निर्णय दिला आहे.

हेही वाचा >>> केकेआरच्या गोलंदाजांनी हात टेकले, पॉवरफुल वॉर्नरची तुफान फटकेबाजी, अर्धशतक झळकावून रचला ‘हा’ नवा विक्रम

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील १९ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने कोलकातासमोर २१६ धावांचे आव्हान उभे केले. हे आव्हान गाठण्यासाठी कोलकाताचे अजिंक्य रहाणे आणि व्यकटेश अय्यर सलामीला आले होते. मात्र पहिल्या तीन चेंडूंमध्ये पंचाने तीन वेळा चुकीचा निर्णय दिला. पंचांनी पहिल्या दोन चेंडूत अजिंक्य रहाणेला बाद ठरवलं. पण डीआरएस घेतल्यामुळे अजिंक्य रहाणे दोन वेळा नाबाद राहिला. तर तिसऱ्या चेंडूंमध्ये चेंडू बॅटची किनार पकडून यष्टीरक्षकाच्या हातात विसावूनही पंचाने अजिंक्य रहाणेला बाद म्हणून घोषित केलं नाही.

हेही वाचा >>> चुकीच्या पद्धतीने बाद दिल्यामुळे विराट संतापला, आरसीबीने तर सांगितला थेट नियम, MI vs RCB सामन्यात पंचाची पुन्हा चूक?

पंचांच्या या चुकीच्या निर्णयामुळे आयपीएलमध्ये यापूर्वी अनेक संघांना मोठा फटका बसला आहे. एकीकडे बंगळुरु विरुद्ध मुंबई या सामन्यात विराट कोहलीला चुकीच्या पद्धतीने बाद घोषित केल्याचा आरोप होतोय. असे असताना आता आजच्या सामन्यात पंचांचा तीन वेळा निर्णय चुकल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येतोय.