पीटीआय, पुणे : ‘आयपीएल’ क्रिकेटमध्ये रविवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने येणार असून या सामन्यात रवींद्र जडेजा आणि हार्दिक पंडय़ा या अष्टपैलू कर्णधारांमधील चुरस पाहायला मिळेल. जडेजा आणि पंडय़ा यांना यंदा ‘आयपीएल’मध्ये पहिल्यांदाच कर्णधारपदाची धुरा सांभाळण्याची संधी मिळाली. पंडय़ाने या संधीचे सोने केले असून त्याच्या नेतृत्वाखालील गुजरातला आतापर्यंत पाचपैकी चार सामने जिंकण्यात यश आले आहे. जडेजाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नईला मात्र पाचपैकी चार सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे; परंतु गेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्ध चेन्नईने आपले विजयाचे खाते उघडले. त्यामुळे जडेजा आणि पंडय़ा हे कर्णधार, तसेच खेळाडू म्हणून कशी कामगिरी करतात, त्याचप्रमाणे या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो याकडे चाहत्यांचे लक्ष असेल.

  • पंडय़ा, फर्गुंसनवर भिस्त

गुजरातच्या संघाची भिस्त प्रामुख्याने कर्णधार पंडय़ा आणि वेगवान गोलंदाज लॉकी फर्गुंसनवर आहे. पंडय़ाने यंदा विशेषत: फलंदाजीत चमकदार कामगिरी केली आहे. चौथ्या क्रमांकावर खेळताना त्याने आतापर्यंत ७६च्या सरासरीने २२८ धावा केल्या आहेत. फलंदाजीत त्याला शुभमन गिलची चांगली साथ लाभत आहे. गोलंदाजीत फर्गुंसनने पाच सामन्यांत आठ बळी घेतले आहेत. तसेच तारांकित लेग-स्पिनर रशीद खानही टिच्चून मारा करत आहे.

  • दुबे, उथप्पावर नजर 

चेन्नईला संघ म्हणून फारसे यश लाभलेले नसले, तरी फलंदाजीत मुंबईकर शिवम दुबे (पाच सामन्यांत २०७ धावा) आणि अनुभवी रॉबिन उथप्पा (पाच सामन्यांत १९४ धावा) यांनी अप्रतिम कामगिरी केली आहे. या दोघांनीही रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्धच्या गेल्या सामन्यातही मोठी खेळी केली. चेन्नईला त्यांच्याकडून सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा आहे. अष्टपैलू जडेजाच्या कामगिरीत सुधारणा गरजेची आहे. तसेच ड्वेन ब्राव्हो वगळता चेन्नईच्या गोलंदाजांना अजून छाप पाडता आलेली नाही.