मुंबई : उमरान मलिकचा लक्षवेधी वेग आणि भुवनेश्वर कुमारचे सातत्य हे सनरायजर्स हैदराबादचे बलस्थान. तर दिनेश कार्तिकची स्फोटक फलंदाजी आणि फॅफ डय़ूप्लेसिसचे कुशल डावपेच ही रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुची वैशिष्टय़े. शनिवारी होणाऱ्या हैदराबाद विरुद्ध बंगळूरु ‘आयपीएल’ लढतीत हेच द्वंद्व प्रमुख आकर्षण असेल.

यंदाच्या हंगामात उमरानने आपल्या भेदक माऱ्याने प्रतिस्पर्धी श्रेयस अय्यरसह अनेक मानांकित फलंदाजांना अडचणीत आणले. याआधीच्या पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यातही उमरान आणि भुवनेश्वर जोडीन एकूण सात बळी घेत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. गुणतालिकेत अव्वल चार संघांत असलेल्या हैदराबादच्या संघात टी. नटराजनसारखा  गोलंदाजसुद्धा आहे.

दुसरीकडे, बंगळूरुचा नवा संघनायक डय़ूप्लेसिसने संघाला ७ पैकी ५ सामने जिंकून दिले आहेत. लखनऊविरुद्ध डय़ूप्लेसिसने ९६ धावांची खेळी साकारली होती. कार्तिकच्या विजयवीराच्या क्षमतेचे कौतुक केले जात आहे. बंगळूरुकडे जोश हॅझलवूड, हर्शल पटेल, मोहम्मद सिराज, वानिंदू हसरंगा यांच्यासारखे गोलंदाज आहेत.

’ वेळ : सायं. ७.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी, सिलेक्ट १