scorecardresearch

IPL 2022 : पराभवाची मालिका खंडित करण्याचा चेन्नईचा निर्धार; आज पंजाब किंग्जशी सामना

आतापर्यंतचे दोन्ही सामने गमावणाऱ्या गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये विजयपथावर आणण्यासाठी कर्णधार रवींद्र जडेजाला सर्व आघाडय़ांवर प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.

RAVINDRA JADEJA

पीटीआय, मुंबई : आतापर्यंतचे दोन्ही सामने गमावणाऱ्या गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये विजयपथावर आणण्यासाठी कर्णधार रवींद्र जडेजाला सर्व आघाडय़ांवर प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. रविवारी त्यांचा तिसरा सामना पंजाब किंग्जशी होणार आहे.

चेन्नईची वाटचाल यंदा अपयशाने झाली. सलामीची लढत कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध गमावल्यानंतर लखनऊ सुपर जायंट्सकडूनही त्यांनी पराभव पत्करला. पहिल्या सामन्यात चेन्नईची फलंदाजी कोलमडली, तर दुसऱ्या सामन्यात २१० धावांचे लक्ष्य उभारूनही गोलंदाजांमुळे संघ अयशस्वी ठरला. दुसरीकडे, पंजाब किंग्जकडे एकापेक्षा एक धडाकेबाज फलंदाज आहेत. त्यामुळे सलामीच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्ध आरामात विजय मिळवला; परंतु कोलकाताच्या गोलंदाजांविरुद्धविरुद्ध फलंदाजांच्या हाराकिरीमुळे पराभव पदरी पडला.

चहर, मिल्ने, जॉर्डनची उणीव

वेगवान गोलंदाज दीपक चहर, अ‍ॅडम मिल्ने आणि हाणामारीच्या षटकांत टिच्चून गोलंदाजी करणाऱ्या ख्रिस जॉर्डनची चेन्नईच्या गोलंदाजीच्या फळीला तीव्र उणीव भासत आहे. तुषार देशपांडे आणि मुकेश चौधरी लखनऊविरुद्ध झगडताना आढळले. गोलंदाजांसाठी आव्हानात्मक ठरणाऱ्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर या दोघांना कामगिरीत सुधारणा करावी लागणार आहे. ड्वेन ब्राव्हो दर्जाला साजेशी गोलंदाजी करीत आहे; परंतु त्याला तोलामोलाची साथ आवश्यक आहे. पहिल्या सामन्यात जडेजा अपयशी ठरला. जडेजाकडून विजयवीराच्या कामगिरीची अपेक्षा आहे. लखनऊविरुद्ध अनुभवी रॉबिन उथप्पा, मोईन अली आणि शिवम दुबे यांनी उत्तम फलंदाजी केली; परंतु गतहंगामात सर्वाधिक धावा काढणारा सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या (०, १) खात्यावर यंदा धावांचा दुष्काळ जाणवत आहे. महेंद्रसिंह धोनीकडून सातत्याने धावा होत आहेत.

भानुकावर भिस्त

मयांक अगरवाल, शिखर धवन आणि भानुका राजपक्षा यांच्यासारख्या फलंदाजांचा समावेश पंजाबच्या आघाडीच्या फळीत आहे. ओडीन स्मिथ आणि शाहरूख खान अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करण्यात तरबेज आहेत. कोलकाताविरुद्धच्या लढतीत पंजाबच्या गोलंदाजीच्या माऱ्यात कॅगिसो रबाडाचा समावेश करण्यात आला होता; पण आंद्रे रसेलने राहुल चहर वगळता सर्वच गोलंदाजांवर हल्ला चढवला. चहर आणि हरप्रीत ब्रार या गोलंदाजांची कामगिरी सामन्याच्या निकालाच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक ठरू शकते.

  • वेळ : सायं. ७.३० वा.  ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, सिलेक्ट १ (संबंधित एचडी वाहिन्या)

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ipl 2022 chennai decision break losing streak face punjab kings today ysh

ताज्या बातम्या