आज डय़ूप्लेसिसच्या नेतृत्वाखालील बंगळूरुचे आव्हान

नवी मुंबई : गतविजेता चेन्नई सुपर किंग्जचा संघ सलग चार पराभवांची मालिका खंडित करण्यासाठी उत्सुक असून मंगळवारी त्यांच्यापुढे फॅफ डय़ूप्लेसिसच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे आव्हान असेल.

चेन्नईच्या संघाने यंदाच्या हंगामात निराशाजनक कामगिरी केली आहे. त्यांनी आपले चारही सामने गमावले असून फलंदाजीत त्यांना केवळ एकदा २०० धावांचा टप्पा पार करता आला आहे. तसेच दीपक चहरच्या अनुपस्थितीत चेन्नईच्या गोलंदाजांनाही छाप पाडता आलेली नाही. मात्र, बंगळूरुविरुद्ध या कामगिरीत सुधारणा करण्याचा त्यांचा मानस आहे.

दुसरीकडे, बंगळूरुला पंजाब किंग्जविरुद्ध सलामीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर त्यांनी आपला खेळ उंचावत कोलकाता, राजस्थान आणि मुंबई यांच्याविरुद्ध सलग तीन सामने जिंकले. त्यामुळे चेन्नईविरुद्धच्या सामन्यात विजयी घोडदौड कायम राखण्याचा बंगळूरुचा प्रयत्न असेल. ’ कामगिरीत सुधारणा गरजेची

सलग चार सामने गमावल्याने चेन्नईच्या खेळाडूंचा आत्मविश्वास खालावल्याचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेिमग यांनी सांगितले आहे. मात्र, सर्व खेळाडू कामगिरीत सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. चेन्नईला  सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि अष्टपैलू मोईन अली यांच्याकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. हंगामातील पहिला विजय मिळवण्यासाठी मोईन आणि कर्णधार रवींद्र जडेजा यांनी अष्टपैलू योगदान देणे आवश्यक आहे.

विराट, फॅफवर नजर

बंगळूरुने गेल्या सामन्यात मुंबईवर मात केली आणि  या विजयात विराट कोहलीने ४८ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. मात्र, विराटला यंदा एकही अर्धशतक झळकावता आले नसून आता मोठी खेळी करण्यासाठी त्याचा मानस आहे. फॅफने सलामीच्या लढतीत ८८ धावांची खेळी केली, पण त्यानंतर त्याला धावांसाठी झगडावे लागले आहे. त्यामुळे चेन्नईविरुद्ध या दोघांच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असेल.

* वेळ : सायं. ७.३० वा. * थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्यांवर)