आयपीएलच्या पंधराव्या हंगामामध्ये सातव्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने चेन्नईला धूळ चारत दणदणीत विजय संपादन केला. या विजयासाठी एव्हिन लुईस आणि आयुष बदोनी यांनी नेत्रदीपक खेळ केला. लखनऊने चेन्नईच्या हातातून विजय खेचून आणल्यामुळे गौतम गंभीरला भावना अनावर झाल्या. आयुष बदोनीने जोरदार फटकेबाजी केल्यामुळे विजय सुकर झाल्यानंतर गंभीरने विजयाचा आनंद अनोख्या पद्धतीने व्यक्त केलाय.

लखनऊ आणि चेन्नई यांच्यामधील सामना चांगलाच अटीतटीचा झाला. हा सामना शेवटच्या षटकापर्यंत गेल्यामुळे कोणाचा विजय होणार हे सांगणे अवघड झाले होते. १८ व्या षटकात दीपक हुडा बाद झाल्यानंतर लखनऊला शेवटच्या दोन षटकांत ४३ धावांची गरज होती. यावेळी आयुष बदोनी मैदानात फलंदाजी करण्यासाठी उतरला. लखनऊवर दबाव वाढलेला असताना १९ व्या षटकात लुईस-बोदोनी या जोडीने २५ धावा केल्या. त्यानंतर मात्र हा सामना पूर्णपणे लखनऊच्या बाजूने झुकला. २० व्या षटकामध्ये बदोनीने पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला. याच षटकारानंतर लखनऊचा विजय पक्का झाल्यामुळे गंभीरला आनंद गगनात मावेनासा झाला.

बदोनीने षटकार लगावताच गंभीरला आनंद झाला. त्याने या षटकारानंतर जागेवरुन उठत जल्लोष केला. गौतम गंभीरची बिकट परिस्थितही कोणतीही प्रतिक्रिया न देता संयम राखून खेळणारा खेळाडू ओळख आहे. मात्र यावेळी सामना जिंकल्यानंतर गंभीरने जल्लोष केल्यामुळे त्याचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

तसेच दुसरीकडे सामना संपल्यानंतर गंभीर आणि चेन्नई सुपर किंग्जचा खेळाडू महेंद्रसिंह धोनी हे दोघे गप्पा मारत उभे होते. धोनी हसत खेळत गंभीरसोबत चर्चा करत होता. या दोघांचा व्हिडीओ आणि काही फोटोदेखील चर्चेचा विषय ठरत आहेत.

दरम्यान, सामन्याच्या शेवटी लुईस आणि आयुष बदोनी यांनी संघाला सावरत अशक्य वाटत असलेले काम करुन दाखवले. शेवटच्या षटकात सात धावांचे लक्ष्य असताना बदोनीने पहिल्याच चेंडूमध्ये जोराचा षटकार लगावला. त्यानंतर पाच चेंडूमध्ये एक धाव करावयची असल्यामुळे सामना लखनऊच्या बाजूने झुकला. त्यानंतर षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर आयुषने जोराचा फटका मारत धाव घेतली. परिणामी लखनऊने सहा गडी आणि तीन चेंडू राखून विजय नोंदवला.