गुरुवारी महेंद्रसिंह धोनीने पुन्हा एकदा दाखवून दिले की त्याला जगातील सर्वोत्तम फिनिशर का म्हटले जाते. धोनीने २०व्या षटकातील शेवटच्या चार चेंडूत १६ धावा करत चेन्नई सुपर किंग्जला रोमहर्षक विजय मिळवून दिला. धोनीने चेन्नईला मुंबई इंडियन्सविरुद्ध अविश्वसनीय विजय मिळवून दिला तेव्हा जडेजा पॅव्हेलियनमधून मैदानात आला आणि त्याने आपल्या माजी कर्णधारापुढे डोके टेकवले.

त्याआधी आयपीएल २०२२ सुरू होण्यापूर्वीच कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. धोनीनंतर रवींद्र जडेजा सीएसकेचा कर्णधार बनला आहे. पण धोनी वेळोवेळी रवींद्र जडेजाला मदत करताना दिसतो. कधी धोनी मैदानावर फिल्डिंग लावताना दिसतो तर कधी जडेजाला बॉलिंग करताना कॅप्टन्सीच्या टिप्स देताना दिसतो. मुंबईविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यातही धोनीने किरॉन पोलार्डला आपल्या जाळ्यात अडकवले.

मुकेश चौधरीने चेन्नईला चांगली सुरुवात करून दिली. पॉवरप्लेमध्येच रोहित शर्मा, इशान किशन आणि डेवाल्ड ब्रेव्हिससारखे खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतले होते. धोकादायक दिसणार्‍या सूर्यकुमार यादवलाही सॅन्टनरने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर शेवटचा धोका होता तो चेन्नईच्या गोलंदाजांना पराभूत करणारा किरॉन पोलार्ड.

पोलार्डला बाद करण्यासाठी धोनीने शिवम दुबेला स्क्रीनसमोर उभे केले. किरॉन पोलार्ड अनेकदा या दिशेने मोठा शॉट खेळताना दिसतो. धोनीचा निर्णय सीएसकेच्या हिताचा होता. महेश दिक्षानाच्या १७व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर पोलार्डने समोरून एक फटका मारला. तेथे उपस्थित दुबेला फारसे हालण्याचीही गरज भासली नाही आणि त्याने एक साधा झेल घेतला. धोनीच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. १२ वर्षांपूर्वी २०१० च्या आयपीएल फायनलमध्ये धोनीने पोलार्डला अशाच प्रकारे बाद केले होते.

खराब सुरुवात करूनही मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जसमोर १५६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मुंबईला या धावसंख्येपर्यंत नेण्यात तिलक वर्माने महत्त्वाची भूमिका बजावली. तिलक वर्माने ४३ चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ५१ धावांची नाबाद खेळी खेळली. तर तर मुकेश चौधरीने तीन षटकांत १९ धावांत तीन बळी घेतले. प्रत्युत्तरात चेन्नईच्या संघाने २० षटकांत सात बाद १५६ धावा करून सामना जिंकला. धोनी १३ चेंडूत २८ धावा करून नाबाद परतला.