आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सर्वच लढती रंगतदार होत आहेत. पूर्ण दहा संघ तूल्यबळ असल्यामुळे सुरशीच्या लढती पाहायला मिळत आहेत. आज या हंगामातील अकरावा सामना मुंबईमधील ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये खेळवला जाणार असून या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज हे दोन बलाढ्य संघ एकमेकांशी भिडणार आहेत. पंजाब आणि चेन्नई गुणतालिकेत अनुक्रमे सातव्या आणि आठव्या स्थानावर आहेत. त्यामुळे आजच्या सामान्यात कोण सरस ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत दोन सामने खेळलेले असून या दोन्ही सामन्यांमध्ये या संघाला पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. त्यामुळे चेन्नईवर दबाव वाढलेला असून आजचा सामना जिंकण्यासाठी हा संघ प्रयत्न करेल. तर दुसरीकडे पंजाबने दोन सामन्यांपैकी एका सामन्यात विजयाला गवसणी घातलीय. पंजाबची स्थिती चेन्नईपेक्षा चांगली असली तरी गुणतालिकेत वर जाण्यासाठी पंजाबला प्रयत्न करावा लागणार आहे.

चेन्नईने अखेरचा सामना लखनऊ सुपर जायंट्सविरोधात खेळलेला असून या सामन्यात चेन्नईचा पराभव झाला होता. या सामन्यात रॉबिन उथप्पाने ५० धावा तर शिवम दुबेने ४९ धावा करत चांगली फलंदाजी केली होती. त्यामुळे आजच्या सामन्यातही हे खेळाडू चांगली कामगिरी करतील अशी आशा आहे. त्याचबरोबर मोईन अली, कर्णधार रविंद्र जाडेजा, महेंद्रसिंह धोनी या दिग्गजांकडूनही आजच्या सामन्यात चांगल्या फलंदाजीची अपेक्षा आहे. या सामन्यात गोलंदाजांनी चांगला खेळ केला नाही. त्याचा परिणाम म्हणून लखनऊने मोठी धावसंख्या उभी केली होती. त्यामुळे या सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजांनीही मेहनत घ्यावी लागणार आहे.

तर दुसरीकडे पंजाबने एक सामना जिंकलेला असला तरी अजूनही हा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. कोलकाताशी सामना करताना हा संघ पूर्णपणे ढासळला होता. या सामन्यात पंजाबचे फलंदाज अयशस्वी ठरले. त्यामुळेच हा संघ केकेआरविरोधात १५० धावादेखील करु शकला नाही. परिणामी या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. पंजाबला आपल्या गोलंदाजीमध्येही बऱ्यापैकी सुधारणा करावी लागणार आहे. कसिगो रबाडाकडून चांगल्या खेळाची आशा आहे. मागील सामन्यांत राहुल चहरने फिरकी गोलंदाज म्हणून चांगली कामगिरी केलेली आहे. त्याचे हेच सातत्य या सामन्यातही अपेक्षित आहे.

चेन्नई सुपर किंग्जचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन

ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायडू, एमएस धोनी (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (कर्णधार), शिवम दुबे, ड्वेन ब्राव्हो, ड्वेन प्रिटोरियस, मुकेश चौधरी, तुषार देशपांडे

पंजाब किंग्जचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन

मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, भानुका राजपक्षे (यष्टीरक्षक), शाहरुख खान, ओडियन स्मिथ, राज बावा, अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, राहुल चहर

आजचा सामना किती वाजता, कोठे खेळवला जाणार ?

आजचा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होणार आहे.

सामना कोठे पाहता येईल?

आजचा सामना स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ एचडी, स्टार स्पोर्ट्स ३, स्टार स्पोर्ट्स ३ एचडी या चॅनेल्सवर हा सामना पाहता येईल. तसेच Disney Plus Hotstar app वरही हा सामना पाहता येईल. या सामन्याचे सर्व अपडेट्स तुम्हाला loksatta.com या लोकसत्ताच्या ऑफिशिअल वेबसाईटवर मिळतील.